

‘सॉइल टू सिल्क’मधून
गावातच मूल्यसाखळी उभारणी
तुती, टसरपासून धागा, वस्त्रनिर्मितीवर शासनाचा होणार
संदीप नवले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील रेशीम शेती आणि उद्योगाला चालना देण्यासाठी गावपातळीवर संपूर्ण मूल्यसाखळी उभारण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘सॉइल टू सिल्क’मधून आत्मनिर्भर रेशीम ग्राम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तुती व टसर रेशीम शेतीपासून कोष उत्पादन, रेशीम धागा, रंगकाम, वस्त्रनिर्मिती आणि बाजारपेठेपर्यंतची प्रक्रिया एकाच क्लस्टरमध्ये विकसित करण्यावर शासनाचा भर आहे.
राज्यात बीड, जालना आणि बारामती येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठा कार्यरत आहेत. सोलापूर आणि जालना येथे नव्याने कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेशीम उत्पादकांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊन उत्पादनाला योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये रेशीम कार्यालये कार्यरत असून, जळगाव येथे नव्याने जिल्हा रेशीम कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रेशीम उद्योगाशी संबंधित योजना, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.
बारामतीत कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र
बारामती येथे राज्यातील पहिले कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रामध्ये कोषापासून रेशीम धागा, वस्त्र तसेच विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकरी आणि नव-उद्योजकांना दिले जाणार आहे. त्यामुळे केवळ रेशीम कोष विक्रीवर अवलंबून न राहता त्यापुढील प्रक्रिया आणि मूल्यवर्धनातून उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
टसर उद्योगाला प्रोत्साहन
गडचिरोली जिल्ह्यातील टसर रेशीम उद्योगालाही शासनाकडून विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी आणि वननिवासी बांधवांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन यांच्यात जुलै २०२६ मध्ये संयुक्त प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
गावातच संपूर्ण मूल्यसाखळी
‘सॉइल टू सिल्क’ संकल्पनेत तुतीची लागवड आणि रेशीम कीटकांचे संगोपन यापासून सुरुवात करून कोष उत्पादन, धागानिर्मिती, रंगकाम, वस्त्रनिर्मिती आणि बाजारपेठ अशी संपूर्ण मूल्यसाखळी गावात विकसित केली जाणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासोबतच उत्पादकांना बाजारपेठेशी थेट जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रेशीम कोष उत्पादन वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कोषपूर्व, कोषोत्तर प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाचे टप्पे एकत्रित केल्यास प्रत्येक टप्प्यावर रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण होऊ शकतात. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, बँका, रेशीम विभाग तसेच संबंधित शासकीय विभागांचा समन्वय साधला जाणार आहे.
विशेषतः महिला आणि युवकांसाठी गावातच वर्षभर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच प्रगत रेशीम गावांचा ‘रोल मॉडेल रेशीम ग्राम’ म्हणून विकास करून त्यांची यशोगाथा राज्यातील इतर गावांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे. यातून राज्यात रेशीम शेती आणि ग्रामीण वस्त्रोद्योगाची व्यापक चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
कोट ----
राज्यात ‘सॉइल टू सिल्क’मधून - आत्मनिर्भर रेशीम ग्राम’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणू. राज्याला अग्रगण्य रेशीम आणि ग्रामीण वस्त्रोद्योग राज्य बनविण्याचा शासनाचा दृढ संकल्प आहे.
- संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.