मोबाईल, रोकड, एटीएम कार्ड हिसकावले

मोबाईल, रोकड, एटीएम कार्ड हिसकावले
Published on

चाकूचा धाक दाखवून मारहाण, मोबाईलसह, रोकड, एटीएम कार्ड हिसकावले

विजापूर नाका पोलिसांनी दोघांना अटक, आणखी एकाचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ :

मध्यरात्री एकच्या सुमारास एका हॉटेलमधून बाहेर पडल्यावर संजीवकुमार परमेश्वर जावळकोटी (रा. जाईजुई नगर, विजापूर रोड) यांना दोघांनी आडविले. दुचाकीवर बसवून काही अंतरावर नेले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल, रोकड व एटीएम कार्ड हिसकावून नेले. ९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती, पण घाबरलेल्या संजीवकुमार यांनी १ सप्टेंबरला विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी २४ तासांत दोन्ही संशयितांना जेरबंद केले आहे.
फिर्यादी संजीवकुमार हे ९ ऑगस्ट रोजी विजापूर रोडवरील गुलमोहर हॉटेलकडे गेले होते. घरच्यांचा फोन आल्याने ते हॉटेलमधून बाहेर आले आणि त्यावेळी दोन अनोळखी तरुणांनी त्यांना थांबवून दमदाटी केली. त्यानंतर दुचाकीवर बसवून पुणे बायपास रोडवर नेले आणि त्याठिकाणी पुन्हा बेदम मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्यानंतर दोघे दुचाकीवरून पसार झाले होते. मारहाणीत जखमी संजीवकुमार हे घाबरून पोलिसांत गेलेच नाहीत. मंगळवारी (ता. १) त्यांनी विजापूर नाका पोलिसांत जाऊन घडलेला प्रकार सांगितला.

गुन्हा दाखल होताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे शितलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने संशयितांचा शोध घेतला. हत्तुरे वस्तीजवळील ब्रिजखाली त्यांना पकडले आणि अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, त्यांनी मोबाईल विकला असून पैसेही खर्च केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यातील तिसरा संशयित तन्वीर शेख याचा पोलीस शोध घेत आहेत.
-------------------
चौकट
‘एटीएम’ घेतले अन्‌ पासवर्डसाठी मारहाण
मड्डी वस्तीतील बाबू देविदास सरवदे (वय २६) व निहाल गुडूभाई शेख (रा. बरूर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्यादी संजीवकुमार यांच्याकडील साडेतीन हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर खिशातील मोबाईल व पाकिटातील एटीएम कार्डही घेतले. एटीएमचा पासवर्ड सांग म्हणून संजीवकुमारला बेदम मारले. एटीएम कार्डचा पिन घेऊन ते एटीएम केंद्रावर गेले. तेथे जुना पासवर्ड बदलून नवा पासवर्ड टाकला आणि ३५ हजार रुपये काढले. त्यानंतर त्यांनी फोन पेवरूनही पाच हजार रुपये घेतले होते. पोलिसांनी हाच धागा पकडून संशयितांना जेरबंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com