ऑगस्ट क्रांती दिन विशेष

ऑगस्ट क्रांती दिन विशेष
Published on

ऑगस्ट क्रांती दिन विशेष
...........................
१९४२ ला सोलापूरच्या न्यायालयावर फडकवला होता तिरंगा
बाबूराव गवळी अन् हिरालाल दोशी यांनी तेव्हाच्या न्यायाधिशापुढे म्हटले होते, ‘चले जाव’
प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, इतिहासाचे अभ्यासक
इंट्रो...
ब्रिटिश सत्तेविरुद्ध ‘चले जाव’चा नारा देत देशभर स्वातंत्र्याची निर्णायक लढाई सुरू झाली, तेव्हा सोलापूरही त्यात आघाडीवर होते. १९४२ मध्ये बाबूराव गवळी आणि हिरालाल दोशी यांनी सोलापूरच्या जिल्हा न्यायालयावरील युनियन जॅक उतरवून त्याजागी तिरंगा फडकावला. त्यानंतर तेव्हाच्या न्यायाधिशापुढेच ‘चले जाव’ आणि ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणा देत ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले.
............
१९३०च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सोलापूरने ब्रिटिश सत्तेला हादरा देत साडेतीन दिवस स्वातंत्र्य अनुभवले होते. परिणामी ब्रिटिश सरकारला मार्शल लॉ पुकारावा लागला. मल्लप्पा धनशेट्टी, अब्दुलरसूल कुर्बान हुसेन, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे यांच्यावर आकसाने खटले भरून त्यांना फासावर लटकावण्यात आले. या चार नरवीरांनी माफी मागण्यास नकार देवून हौतात्म्य पत्करले. तोच जोश, तोच एल्गार सोलापूरकरांनी १९४२ च्या चलेजाव चळवळीतही ब्रिटीश राजवटीविरुध्द दाखवून दिला होता. ८ ऑगस्टला मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी ‘करो वा मरो’चा संदेश दिला. त्याच रात्री गांधीजींसह प्रमुख नेत्यांना अटक झाली आणि ९ ऑगस्टपासून चळवळ देशभर पेटली.
सोलापुरात चळवळीचे काम मोठ्या प्रमाणावर भूमिगत पद्धतीने सुरू होते. मुंबईहून येणारी स्वातंत्र्यचळवळीची बुलेटिन्स गुप्तपणे वितरित केली जात. कवीवर्य रा. ना. पवार, रंगाअण्णा वैद्य, पु. ज. बुवा, व्ही. आर. कुलकर्णी, वि. गु. शिवदारे आदी कार्यकर्ते स्वतःही बुलेटिन्स लिहून रात्रीच्या वेळी शहरात पोहोचवत. भाई छन्नुसिंग चंदेले, भाई एम. डी. विभूते, कमलाकर सुमंत, डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर, तुळशीदास जाधव, शिवलाल शहा, द्वारकाबाई देशपांडे, रमाबाई पित्रे, हिरालाल दोशी यांच्यासह अनेक वकील, पत्रकार, विद्यार्थी, महिला आणि सामान्य नागरिकांनी चळवळीत सहभाग घेतला.
चलेजाव चळवळीतील सहभागाबद्दल अनेकांना स्थानबद्धता आणि तुरुंगवास भोगावा लागला. छन्नुसिंग चंदेले आणि एम. डी. विभूते यांनी येरवडा तुरुंगातून पलायनही केले. त्या दोघांना आणि त्यांच्या सारख्या अनेक भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना आश्रय देण्याचे काम शिवलाल शहा (बोरामणीकर) करीत. शिक्षणासाठी पुण्यात राहिलेल्या सोलापूरच्या माधवराव पाटलांनी, बाबुराव चव्हाण, भालबा केळकर अशा चौदाजणांसमवेत वेस्टएंड आणि कॅपीटल थिएटरमध्ये बॉम्बस्फोट करण्याच्या कटात सक्रीय सहभाग घेतला होता.
.............
द्वारकाबाईंचे अहमदाबादेत धाडस..
ज्येष्ठ पत्रकार संपादक रंगाअण्णा वैद्य यांचे घर भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांच्या चळवळीचे केंद्र झालेले होते. पत्रकार म्हणून पुढे परिचित झालेले पु.ज. बुवा हरिभाई देवकरण प्रशालेत शिकत असताना सोलापूरच्या रेल्वेस्टेशनवर बॉम्बचे पार्सल घेवून गेले होते. त्यावेळी शिवलिंग दुधनी यांनी रामदास तर बुवा यांनी काशीनाथ अशी नावे धारण केलेली होती. नागनाथ आयंची यांनी विद्यार्थीदशेत आपल्या चार मित्रांसह चौपाडातील पोस्ट ऑफीस जाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना ५ वर्ष सक्त मजूरीची शिक्षा, १००० रु. दंड व चौदा फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. द्वारकाबाई देशपांडे यांना १९४२ च्या चळवळीत सामील झाल्याबद्दल प्रथम सहा महिन्यांची आणि दंड भरायला पैसे नव्हते म्हणून आणखी दोन महिन्यांची शिक्षा अशी एकूण आठ महिन्यांची शिक्षा झालेली होती. अहमदाबादच्या तुरुंगात असताना २६ जानेवारी १९४३ रोजी इतर १२ महिला कैद्यांच्या समवेत त्यांनी तुरुंगाच्या दरवाज्यावर तिरंगा ध्वज फडकावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com