

जागेसाठी भाजपच्या नगरसेवकांनी स्थायीच्या सभापतींना दिली चुकीची माहिती
सभेत बहुमताने विषय मंजूर, विरोध होताच विषय तहकूब; पठाण बागेची जागा लाटण्याच्या प्रकाराला आळा; सभापतींची सारवासारव
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पठाण बागेची सुमारे दहा हजार चौरस फूट जागा चितोड रजपूत लोहार समाजाला देण्याचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक बिज्जू प्रधाने अन् भारतसिंग बडुरवाले यांनी स्थायी समितीत मांडला. ही जागा दोन हजार चौरस फूट असल्याची माहिती देत सभेत बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी विरोध करत जागा दहा हजार चौरस फूट असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सभापती रंजिता चाकोते यांनी विषय तहकूब केला.
शुक्रवारी महापालिकेची स्थायी समिती सभा झाली. सभेच्या अजेंड्यावर दोनच विषय प्रस्तावित होते. त्यापैकी पठाण बाग परिसरातील सुमारे दहा हजार चौरस फूट जागेची मागणी करणारा सभासद प्रस्ताव नगरसेवक बिज्जू प्रधाने अन् भारतसिंग बडुरवाले यांनी स्थायी समितीमध्ये आणला. चितोड रजपूत लोहार समाज या संस्थेला ही जागा देण्याची मागणी केली होती. या वेळी सभापतींना ही जागा दोन हजार चौरस फूट असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेने ही जागा कोणालाही भाडेतत्त्वावर दिलेली नाही. तरी देखील काही सामाजिक संघटनांनी राजकीय बळाचा वापर करून येथील ऐतिहासिक कलाकेंद्र पाडले होते. या बांधकामाच्या पाडकामातून जागेचा वाद सुरू झाला. नगरसेविका श्रद्धा पवार यांनी पठाण बागेतील कलाकेंद्र चुकीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल देऊन पाडण्यात आल्याप्रकरणी संबंधित अधिकारी अन् जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी तसेच सदर जागा महापालिकेच्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी करणारे पत्र आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना दिले होते. त्यानंतर पुन्हा याच जागेचा ठराव करण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीत आणण्यात आला.
सभेत बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर करण्यात आला. मात्र, अमोल शिंदे यांनी या विषयाला विरोध केला. जागेची माहिती आपण घेतली आहे का? जागा दोन हजार चौरस फूट नसून दहा हजार चौरस फूट आहे. समितीमध्ये जागा लाटण्याच्या प्रकाराला आमचा विरोध राहणार, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यानंतर सभापती रंजिता चाकोते यांनी संबंधित नगरसेवकांकडून जागेबाबत माहिती घेतली. त्यावेळी ही जागा दहा हजार चौरस फूट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सभापतींनी संबंधित नगरसेवकांना अर्धवट माहिती दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली अन् अखेर हा विषय तहकूब केला. मात्र, स्वपक्षातील नगरसेवकांनी चुकीची माहिती दिल्याने सभापती तोंडघशी पडल्याची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर संबंधित विभागाकडून जागेची माहिती उपलब्ध झाली नसल्याने हा विषय तहकूब करण्यात आल्याचे सांगत सभापतींकडून सारवासारव करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.