जागतिक बँक आढावा

जागतिक बँक आढावा
Published on: 

सिटी सर्व्हेपासून मालमत्ता कराच्या नोंदीपर्यंत; जागतिक बँकेच्या पथकाचा आढावा
१२ गावांतील सर्व्हेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची पाहणी; जीआयएस मॅपिंग अन् करनोंदी अद्ययावत करण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : शहरालगतच्या १२ गावांमध्ये सुरू असलेल्या सिटी सर्व्हेसाठी वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान, त्यातून मिळणारी माहिती अन् मालमत्ता कराच्या नोंदी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा जागतिक बँक समूहाच्या जमीनविषयक तज्ज्ञांच्या पथकाने आढावा घेतला. महाराष्ट्र अर्बन वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड रियूज प्रोग्रामअंतर्गत आलेल्या पथकाचा सोलापूर महानगरपालिकेतील दोन दिवसीय अभ्यासदौरा मंगळवारी पूर्ण झाला.

दुसऱ्या दिवशी पथकाने भूमी अभिलेख अन् नगररचना विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली. १२ गावांतील सिटी सर्व्हेची कार्यपद्धती, त्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, सर्व्हेतून उपलब्ध होणारी माहिती अन् तिचे अद्ययावतीकरण याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. भूमी अभिलेख विभागाचे उपनिबंधक सचिन पवार यांनी विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.

मालमत्ता कराच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी गाळ्यांचे जीआयएस मॅपिंग, ठराविक कालावधीनंतर होणारे मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन यावरही चर्चा झाली. एखादा गाळा रिकामा झाल्यानंतर त्याची माहिती मालमत्ता कराच्या नोंदीत कशी प्रतिबिंबित होते, त्यानुसार पुढील वर्षाच्या कर आकारणीत बदल होतो का, याची माहितीही पथकाने घेतली.

नगररचना विभागाच्या आढाव्यात विकास आराखडा (डीपी प्लॅन), न्यू डीसीपीआर प्रणाली अन् महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ (एमआरटीपी ॲक्ट) याबाबत माहिती घेण्यात आली. शहर विकास आराखड्याची सद्यस्थिती, त्यातील तरतुदी अन् शहर नियोजनातील त्याचे महत्त्व यावरही चर्चा झाली. नगररचना विभागाचे उपसंचालक शितोळे यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com