

चौकांमधील बॅनरला परवानगी बंधनकारकच
आता पोलिस तपासणार परवाने; पोलिस आयुक्तांचे प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : उच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवून सोलापूर शहरात आमदारांचे समर्थक, कार्यकर्ते महापालिकेच्या परवानगीशिवाय चौकाचौकांत, रस्त्यांलगत डिजिटल बॅनर लावत आहेत. यातून स्पर्धा निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर आता शहरातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारीच त्या बॅनरला रीतसर परवानगी आहे का, याची पडताळणी करणार आहेत.
सोलापूर शहरातील मुख्य चौकांसह इतरही काही ठिकाणे ‘नो डिजिटल झोन’ आहेत. याशिवाय अन्य ठिकाणी बॅनर बसविण्यापूर्वी त्यावरील मजकूरच पोलिसांकडून तपासून घेणे, महापालिकेकडे त्यासाठी शुल्क भरणे आवश्यक आहे. मात्र, सण-उत्सव, लोकप्रतिनिधी किंवा पक्षातील बड्या नेत्यांचे वाढदिवस, महापुरुषांची जयंती असते. त्यावेळी कोणतीही परवानगी न घेताच बहुतेक ठिकाणी बॅनर लावले जातात. यात ‘नो डिजिटल झोन’चा देखील समावेश असतो. असे प्रकार मागील काही महिन्यांपासून वाढत असल्याने दोन गटांत किंवा लोकप्रतिनिधींच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण होत आहेत. यामुळे महापालिकेच्या विभागीय कार्यालयांच्या मदतीने विनापरवाना फलक हटविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
---
कोट
PNE26W58123
महापालिकेने शहरात काही चौक ‘नो डिजिटल झोन’ म्हणून घोषित केले आहेत. त्या ठिकाणी कोणताही डिजिटल बॅनर, फलक अपेक्षित नाही. याशिवाय अन्य ठिकाणी बॅनर लावायला काही हरकत नाही, पण त्यासाठी रीतसर महापालिका व स्थानिक पोलिसांचा परवाना आवश्यक आहे. आता अशा फलक, बॅनरला परवाना आहे की नाही, आम्ही चेक करू.
- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर
---
चौकट
झोन अधिकाऱ्यांना यावे लागणार
शहरात एकूण आठ विभागीय कार्यालये (झोन) आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी आहेत. त्या त्या भागातील अतिक्रमणे, विनापरवाना बॅनर, समस्या सोडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, चौकाचौकांतील डिजिटल बॅनर, फलकांकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कानाडोळा होत असल्याचे अनुभव पोलिसांनाही येतात. अनेकदा विनापरवाना बॅनर काढण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना संपर्क साधला की ते बाहेर असल्याचे सांगतात किंवा त्यांचा फोन बंद असतो, असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आता विनापरवाना बॅनर काढताना झोन अधिकारी किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पोलिसांसोबत उपस्थित राहावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.