

हरकतदारांना आज मिळणार सहनिबंधकांचा आदेश
डीसीसी प्रारूप मतदार यादी : उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग
---
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींवर सहनिबंधक तथा बँकेचे निबंधक दिग्विजय आहेर यांनी शुक्रवारीच (ता. ९) आदेश केले आहेत. या आदेशातील प्रत अद्याप हरकतदारांना मिळालेली नाही. प्रत नसल्याने आपल्या हरकतीचे काय झाले, याचा कागद हरकतदारांच्या हातात नाही. त्यामुळे त्यांना पुढील निर्णय घेण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. उद्यापासून (सोमवार, ता. १२) हे आदेश हरकतदारांना मिळण्याची शक्यता आहे.
पुण्यातील सहकार विभागाची संपूर्ण यंत्रणा बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अडकली आहे. राज्यातील लक्षवेधी लढत या कारखान्याच्या निमित्ताने होत आहे. या कारखान्यासाठी आज मतदान झाले असून उद्या (सोमवार) मतमोजणी आहे. या कारखान्याच्या निवडणुकीमुळे सोलापूर डीसीसी बँकेच्या हरकदारांना आदेश मिळण्यास विलंब झाल्याचे समजते. सहनिबंधक कार्यालयाकडून हे आदेश हरकतदारांना सोलापुरच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिले जाण्याची शक्यता आहे.
ोजिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल ३५५ हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवरील लेखी आदेश मिळाल्या शिवाय हरकतदारांना अपिलात जाता येत नाही. अपिलात जाण्यासाठी उच्च न्यायालय हा पर्याय असल्याने किती हरकतदार अपिलात जाणार? या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदार यादीचेच प्रकरण न्यायालयात चालल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच मोठी चुरस न्यायालयात दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी बुधवारी (ता. १४) होणार आहे.
---
यंदा मतदारांची दुहेरी दिवाळी
मतदार यादी अंतिम झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. साधारणता ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा दिवाळी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आहे. डीसीसीची निवडणूक आणि दिवाळी एकाचवेळी आल्याने जिल्हा बँकेच्या मतदारांना यंदा दुहेरी दिवाळी साजरी करण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर साधारणता नोव्हेंबर अखेर जिल्हा बँकेवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.