

प्रभाग वेध - प्रभाग १६
PNE26W42297
सोलापूर : मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील अरुंद गल्ल्यांमध्ये केलेले ड्रेनेज.
पाणी येते, त्याच दिवशी दारात ड्रेनेजचे पाणी
मनपाकडून नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
यशवंत गव्हाणे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : ज्या दिवशी पाणी येते, तेव्हा नागरिक स्वच्छतेची कामे काढतात. नेमके याच काळात प्रभागातील ड्रेनेज तुंबते. त्यामुळे स्वच्छतेची कामे करण्याऐवजी नागरिकांना दारात सांडपाण्याचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रार केली तर त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून जीर्ण व कालबाह्य झालेल्या ड्रेनेज लाइन्समुळे मोदी परिसर, गुरुनानक चौक, आंबेडकरनगर आदी भागांत रस्त्यांवरून फूटभर पाणी वाहत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, महापालिका विभागाकडे या प्रभागातून वारंवार तक्रारी दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, तात्पुरत्या उपाययोजनांखेरीज कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरत असून, आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही केवळ साफसफाईची कामे करून वेळ मारून नेली जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाइन्स बदलून नवीन क्षमतेच्या लाइन्स टाकण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. घाणपाण्याचा निचरा व दुर्गंधीचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. एकूणच, प्रभाग म्हणजे समस्यांचे आगार बनले आहे.
------------------------
कोट
PNE26W42239
प्रभागातील नागरिकांसमोर सध्या सर्वांत गंभीर समस्या ड्रेनेजची आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवर भर न देता कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. महापालिकेने रखडलेल्या नवीन ड्रेनेज व पायाभूत विकासकामांसाठी असणाऱ्या प्राधान्याने ड्रेनेजच्या वाहत्या दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा. या विषयावर तातडीने मार्गी लागल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
- सिद्धाअाप्पा झिंगर्डेकर, नागरिक
------------------------
कोट
प्रभागात ड्रेनेजची समस्या खूप गंभीर आहे. दर पावसाळ्यात गटार तुंबून लोकांच्या घरात पाणी शिरते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून समस्या सोडविण्याचे प्रयत्न होतात; मात्र गावठाण प्रभागावरून नवीन ड्रेनेज घालण्यात यावे व त्यामुळे गावठाण प्रभागात कायमस्वरूपी काम व्हावे, ही अपेक्षा आहे.
- दिनेश लोणारी, नागरिक