चेसी क्रॅक बस

चेसी क्रॅक बस
Published on

PNE26W40227
ई बसडेपोत मोकाट जाणवरानाचा वावर
PNE26W40228
प्रशासकीय इमारत अर्धवट स्थितीतील रस्ता
PNE26W40229
ई बस डेपोच्या मधून सुरु असलेली नागरिकांची ये-जा

चार्जिंग स्टेशनवर २५ कोटी खर्चानंतर
बुधवार पेठेतील जागा अयोग्यची चर्चा
१५ ऑगस्टला ३० नव्हे तर केवळ दहा बसच येणार; महापालिकेचे काम अर्धवट स्थितीत

प्रमिला चोरगी : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : बुधवार पेठेतील ई-बस चार्जिंग स्टेशन, डेपो आणि अन्य सुविधांसाठी तब्बल २५ कोटी रुपये खर्च झाल्यानंतर आता ही जागाच ई-बससाठी अयोग्य असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बस कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकत्याच केलेल्या पाहणीत वाहतूक कोंडी, अपुरी जागा आणि अपूर्ण सुविधांबाबत आक्षेप नोंदविल्याचे समजते. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी अपेक्षित ३० बसांऐवजी सुरुवातीला केवळ १० ते १२ बसच पाठविण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

शहरात तब्बल ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘आपली बस’ योजनेंतर्गत १०० ई-बस मंजूर झाल्या आहेत. वाढती प्रवासी संख्या आणि प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य शासनाने ई-बस प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० पैकी ४० ई-बस सोलापूरला मिळणार आहेत. त्यापैकी १८ बस शहरातील प्रमुख मार्गांवर, तर २२ बस ग्रामीण भागातील मार्गांवर धावणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील ४० ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणीसह शहर व ग्रामीण भागातील मार्ग निश्चित करण्यात आल्याचे महापालिकेने चार महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यानंतर महिनाभरापासून पहिल्या टप्प्यात ३० बस येणार असल्याचा गाजावाजा सुरू झाला. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षभरापासून चार्जिंग स्टेशन उभारणी, डेपो सुविधा आणि इतर तांत्रिक तयारीचे काम सुरू आहे.
बस कंपनीसोबत महापालिकेची अंतिम बैठक झाल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी जागेची आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. ई-बस डेपोतील उर्वरित कामे, अर्धवट स्थितीतील प्रशासकीय इमारत, अपूर्ण सुरक्षाभिंत, परिसरातील तळीरामांचा ठिय्या, अस्वच्छता आणि एकूणच वातावरण पाहता ई-बस डेपोसाठीची जागा योग्य नसल्याचे मत कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला केवळ १० ते १२ बसच पाठविण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल २५ कोटी रुपये खर्च झाल्यानंतर नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करून आता जागाच योग्य नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
----------
प्रत्यक्ष परिस्थिती : अधिकारी म्हणतात
१. वाहतूक कोंडीत ई-बस अडकणार, बसला टर्न घेण्यासाठीही जागा नाही : बस चार्जिंगसाठी बुधवारपेठेत आणणार मात्र त्यांचा थांबा सातरस्ता व राजेंद्र चौक डेपोत असणार.
२. चार्जिंग स्टेशन काम झाले, उर्वरित काम अर्धवट स्थितीत : संबंधित विभागाकडून १० ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होईल. चार्जिंग स्टेशनचे उर्वरित काम संबंधित कंपनीकडून करण्यात येणार आहे.
३. बुधवार पेठेतील जागा ई-बस डेपोसाठी अयोग्य : बरोबर आहे, परंतु जागा यापूर्वीच निश्चित झाली आहे. आम्हाला काही माहिती नाही.
४. पहिल्या टप्प्यात १०-१२ बस मिळणार : कंपनीकडे आम्ही ३० बसची मागणी केली आहे. १५ ऑगस्टला ३० बस मिळतील.
---------
ई-बस डेपोची रचना
एकूण जागा : चार एकर
बस पार्किंग क्षमता : ६० बस
एकावेळी चार्जिंग क्षमता : २० बस
एका बसला चार्जिंग होण्यास लागणार कालावधी : ९० मिनिट
एकदा चार्जिंग केल्यानंतर बस धावणार : १८० कि.मी धावते
---------
महापालिकेच्या मालकीची जागा हवी होती. बुधवारपेठेतील जागा ई-बससाठी यापूर्वीच निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक कोंडीसह इतर अडचणी आहेत. हा माझ्या कार्यकाळातला विषय नाही. पहिल्या टप्प्यात शहरासाठी ३० बस मिळणार आहेत. रेल्वेद्वारे बस सोलापुरात दाखल होतील.
- नीलकंठ मठपती, नियंत्रण अधिकारी, परिवहन विभाग
-------
सोलापूरचा कलर कोड भगवा
- केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या ई-बसचा कलर कोड पांढरा-हिरवा असा संमिश्र दोन कलरच्या बस आहेत. परंतु सोलापूर महापालिका परिवहन विभागाकडून भगव्या रंगाच्या बसची मागणी केली आहे. त्यामुळे सोलापुरातील ई-बस हे भगव्या रंगाचे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com