

ई-बसचे छायाचित्र घ्यावे
‘पॉस’ मशीनवरील स्कॅनरवरून आता ई-बसचे तिकीट
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा पुढाकार; डिसेंबरपासून सुरवात, मार्चमध्ये येतील उर्वरित ७० ई-बस
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : महापालिकेच्या परिवहन उपक्रमात केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई बस’ योजनेतून २० बस दाखल झाल्या आहेत. पुढील टप्प्यात म्हणजेच मार्च महिन्यात उर्वरित ८० बस येणार आहेत. तत्पूर्वी, बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे राहिलेले काम पूर्ण केले जाणार आहे. दुसरीकडे महापालिकेच्या ई-बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डिसेंबरपासून ‘पॉस’ मशीनवरील स्कॅनर स्कॅन करून तिकीट मिळणार आहे. त्यावेळी प्रवाशांकडे रोख रक्कम असावीच, याचे बंधन राहणार नाही.
ई-बस एकदा चार्जिंग केल्यानंतर १८० किलोमीटर धावते. सध्या २० बसच्या प्रमाणात शहर व ग्रामीणमधील जास्त प्रवाशांचे मार्ग निवडून तेथे सेवा सुरू केली आहे. सध्या प्रवाशांना रोख रक्कम देऊन तिकीट काढावे लागते. मात्र, पुढच्या महिन्यापासून ऑनलाईन स्कॅनरवरूनही तिकीट मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांना बसचे लोकेशन (बस सध्या कोठे आहे, थांब्यावर यायला किती वेळ लागतील) मोबाईलवर समजणार आहे. नव्या ई-बसला ‘जीपीएस’ असून त्याला एका ॲपद्वारे जोडले केले जाणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ते ॲप घेऊन ई-बसचे नेमके लोकेशन समजेल, अशी व्यवस्था केली जात आहे. ई-बसचा रंग भगवा (केशरी) असून शहरात नव्याने उभारलेले थांबे देखील याच रंगाचे असणार आहे. ‘लोट्स मिडिया’ कंपनीला बसथांबे उभारणीचे कंत्राट दिले असून त्याची पाच वर्षे देखभाल या कंपनीमार्फत केली जाणार आहे. बस थांब्यावर त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक दिसणार आहे.
------------------
चौकट
ई-बसला रिक्षांचा अडथळा;
आरटीओ, ट्राफिक पोलिसांसोबत बैठक
महापालिकेच्या उपक्रमाअंतर्गत सध्या जुन्या १६ बस आणि नवीन २० ई-बस शहर-ग्रामीणमधील मार्गांवर धावत आहेत. बस थांब्यावर रिक्षा थांबतात. बस थांब्यापासून काही ठराविक अंतरात रिक्षा थांबू नयेत, अशी मागणी महापालिकेने पत्राद्वारे ‘आरटीओ’ व शहर वाहतूक पोलिसांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर चार-पाच दिवसांत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त मनोजकुमार यादव यांची बैठक होणार आहे.
-------------
कोट:
ई-बसच्या चार्जिंग स्टेशनवरील यांत्रिकी विभाग, पार्किंग, बसचे चार्जिंग अशी सगळी व्यवस्था उभारली जात आहे. राहिलेली कामे पुढच्या तीन महिन्यांत पूर्ण होतील, त्यावेळी उर्वरित ८० बस येतील. तत्पूर्वी, कोणत्या मार्गांवर बसगाड्यांची मागणी आहे, नवीन बस कोणकोणत्या मार्गांवर सुरू करता येतील, याचा अंदाज घेतला जाईल.
- सारिका आकुलवार, परिवहन व्यवस्थापक, सोलापूर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.