

PNE26W58715
सोलापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील.
सत्ताधाऱ्यांकडून दबावाचे राजकारण : सतेज पाटील
महाविकास आघाडीचा पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मेळावा; भाजपमध्ये खदखद असल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : गतवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन्ही जागा जिंकल्या. तेव्हा आम्ही सत्तेवर होतो. मात्र, आता सत्ताधाऱ्यांकडून दबावाचे राजकारण केले जात असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केली.
महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. १५) हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार प्रणिती शिंदे यांनी देशात हुकूमशाही आल्याची टीका केली. ही लढाई केवळ पदवीधर-शिक्षक मतदारसंघापुरती मर्यादित नसून देशाच्या अस्तित्वाची आणि धर्मनिरपेक्षतेचा पाया टिकविण्याची आहे, असे त्या म्हणाल्या.
उमेदवार हर्षदा देशमुख म्हणाल्या, ‘जेन झी’ला स्थिरता, पारदर्शकता आणि समान न्याय हवा आहे. त्यामुळे आक्रोश सुरू झाला आहे. शिक्षण हा समाजाचा कणा असताना शिक्षण क्षेत्र ताब्यात घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. सोलापुरात विकासाला अनुकूल वातावरण असूनही मंजूर आयटी पार्क सुरू झालेले नाही. विमानसेवा बंद पडली असून स्थानिक बससेवाही सुरू होत नसल्याने रोजगाराची साखळी तुटली आहे.
उमेदवार जयंत आसगावकर म्हणाले, शिक्षकांची शाळाबाह्य कामांतून सुटका व्हावी, यासाठी लढा दिला. टीईटीतूनही शिक्षकांची मुक्तता व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जुनी पेन्शन योजना लागू व्हायला हवी. सत्ताधाऱ्यांनी आणलेली सुधारित पेन्शन योजना फसवी आहे.
सोलापूरचे वाटोळे करण्याचा डाव
जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना अर्धवट असताना उजनी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे सोलापूरचे वाटोळे होईल. वेळीच जागे न झाल्यास जिल्हा वाळवंट बनेल, अशी भीती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.
५० मतदारांमागे चार कार्यकर्ते
मेळाव्यानंतर सतेज पाटील यांनी हुतात्मा स्मृती मंदिरात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक ५० मतदारांमागे चार कार्यकर्ते नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी शुक्रवारी तालुकानिहाय बैठका घेऊन बूथनिहाय कामाला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
चौकट...
नव्यांकडून भाजपचे ‘टेकओव्हर’; पक्षात खदखद
भाजपमध्ये मोठी खदखद असून दोन्ही देशमुख पक्षात आहेत की नाहीत, हे दिसत नाही. नव्याने आलेल्यांनी पक्षाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगली संधी असल्याचे सतेज पाटील म्हणाले. शिंदे-मोहिते एकत्र असल्याने मैदान आमचेच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार डमी असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांना पाचशे मतेही मिळणार नसल्याने त्यांच्या नेत्यांना भेटून मते मिळविण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.