

कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्याला मिळाले १४२ कोटी
प्रोत्साहन अनुदानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष; कर्जमुक्त झालेल्या सात शेतकऱ्यांना डीसीसीने दिले पुन्हा कर्ज
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून सोलापूर जिल्ह्याला आतापर्यंत १४२ कोटी रुपये मिळाले आहेत. यातील १०३ कोटी रुपये हे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना तर ३९ कोटी ९७ लाख रुपये हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळाले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे, या बाबती मात्र सरकार पातळीवर व स्थानिक पातळीवर काहीच हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
डीसीसी बँकेच्या ३ हजार ९५२ थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपोटी आतापर्यंत ३९ कोटी ९७ लाख ३० हजार ९३१ रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. कर्जमुक्तीचा लाभ घेऊन कर्जमुक्ती झालेल्या सात शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने ३ कोटी ३८ लाख रुपयांचे नव्याने कर्जवाटप केले आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरिप वाया गेला आहे. रब्बीच्या हंगामावरही यंदा दुष्काळाचे सावट आहे. अशा बिकट स्थितीत शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा मोठा आधार शेतकऱ्यांना होत आहे. प्रोत्साहन अनुदानाबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही आता शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
----
कोट
कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नव्याने कर्जवाटप करण्याच्या सूचना आहेत. त्यासोबतच ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण करून घेतले नाही, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ आधारप्रमाणिकरण करून घ्यावे, यासाठी सहकार विभागाची व संबंधित बँकांची यंत्रणा कार्यरत आहे.
- मुकुंद पवार, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.