

एकजुटीची ताकद दिसली; आता ती टिकवण्याचे आव्हान!
सोलापूरच्या शेतकरी चळवळीला नवी उभारी; ऊसदराच्या लढाईपलीकडे शेतकरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकजुटीचा वापर व्हावा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : सोलापूरच्या मातीत आंदोलनांची परंपरा आहे आणि अन्यायाविरोधात एकजुटीने लढण्याची ताकदही. मार्शल लॉविरोधी लढ्यात हौतात्म्य पत्करून स्वातंत्र्यापूर्वीच चार दिवस स्वातंत्र्य अनुभवणाऱ्या या जिल्ह्याने १९७१ च्या दुष्काळात वैराग येथील शेतकरी आंदोलनातून महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेची दिशा दिली, तर १९७२ च्या आंदोलनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवले. मात्र, काळाच्या ओघात शेतकरीही राजकीय पक्षांच्या आणि गटातटांच्या वळचणीला गेल्याने, कारखानदार व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी ओढवण्याच्या भीतीने एकत्रित लढण्याची त्याची इच्छाशक्ती कमी झाली. त्यात शेतकरी संघटनांमधील फाटाफूट आणि नेतृत्वाच्या स्वार्थाची भर पडल्याने चळवळीत मरगळ आली होती. अशा स्थितीत सोमवारी ऊस उत्पादकांनी दाखवलेली अभूतपूर्व एकजूट म्हणजे सोलापूरच्या आंदोलनपरंपरेला मिळालेली नवी उभारी आहे.
२०१४ मधील ऊसदर आंदोलनात वाहनांची तोडफोड, टायर जाळणे, दूध दरवाढीसाठी टँकर अडवणे, दूध रस्त्यावर ओतणे असे संघर्षाचे प्रकार घडले. पण या आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांचा व्यापक सहभाग दिसत नव्हता. राजकीय गटबाजी, कारखानदारांशी असलेले हितसंबंध, सहकारी संस्थांतील पदांची गणिते आणि जातीय राजकारण यांमुळे शेतकरी विभागला गेला. शेतकरी संघटनांमधील फाटाफूट आणि नेत्यांची सत्ताधाऱ्यांशी जवळीक यांचाही त्याला हातभार लागला.
या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेला ऊस उत्पादकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरतो. कोणतीही वाहन किंवा जेवणाची व्यवस्था नसताना हजारो शेतकरी स्वतःच्या खर्चाने, घरची भाकर-चटणी बांधून सहभागी झाले. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही मदतीसाठी पुढे आले. ही केवळ गर्दी नव्हती, तर अनेक वर्षांनंतर शेतकरी प्रश्नावर राजकीय सीमारेषा ओलांडून उभी राहिलेली एकजूट होती. याच प्रतिसादाने यापूर्वी ‘सोलापूर जिल्हा डोक्यातून काढणार’ अशी भूमिका घेणाऱ्या राजू शेट्टी यांनाही आपली भूमिका बदलावी लागली. ‘तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा येणार,’ हे त्यांचे आश्वासन या एकजुटीची दखल घेणारे आहे. दुष्काळी परिस्थिती, पाणी आणि वीजप्रश्नी शेतकऱ्यांची कोंडी आणि कारखानदारांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली नाराजी या एकजुटीमागे आहे. प्रशासनाला गर्दीचा अंदाज आला नाही, तर कारखानदारांनाही शेतकऱ्यांच्या एकत्रित ताकदीची जाणीव झाली.
आता १९ नोव्हेंबरच्या बैठकीत प्रतिटन ३,५०० रुपयांची पहिली उचल मिळणार की संघर्षाची नवी ठिणगी पडणार, हा तातडीचा प्रश्न आहे. मात्र, या आंदोलनाचे यश केवळ ऊसदरापुरते मर्यादित राहू नये. दुष्काळ, सिंचन, वीज, पीकविमा, शेतीमालाला भाव आणि सहकारी संस्थांमधील शेतकऱ्यांचे स्थान अशा प्रश्नांवरही ही एकजूट उपयोगी पडली पाहिजे. त्यासाठी नेतृत्वाने राजकीय स्वार्थापेक्षा शेतकऱ्यांचे हित अग्रस्थानी ठेवावे. एकजुटीचा वापर निवडणुकीच्या गणितांसाठी नव्हे, तर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व्हावा. आंदोलनातून निर्माण झालेली ताकद टिकवणे, हेच आता खरे आव्हान आहे.
चौकट
एकजुटीचे भांडवल वाया जाऊ नये!
- ऊसदरापुरती नव्हे, तर सर्व शेतीप्रश्नांसाठी कायमस्वरूपी समन्वयाची यंत्रणा उभी राहावी.
- राजकीय पक्षांपेक्षा शेतकरीहिताला प्राधान्य देणारी भूमिका नेतृत्वाने घ्यावी.
- आंदोलनानंतरही मागण्यांचा पाठपुरावा, निर्णयांची अंमलबजावणी आणि कारखानदारांच्या आश्वासनांवर लक्ष ठेवावे.
- शेतकऱ्यांची एकजूट ही नेत्यांची ताकद बनण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची ताकद बनावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.