जिल्हाधिकारी करणार मिशन मोडवर करणार भूसंपादन

जिल्हाधिकारी करणार मिशन मोडवर करणार भूसंपादन
Published on

गडकरींच्या तंबीनंतर सोलापूर प्रशासन ‘मिशन मोड’वर
उड्डाणपूल भूसंपादन ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या तंबीनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. मागील १० वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपूल प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत बाधित २४८ पैकी ६५ खासगी मालमत्तांचे संपादन पूर्ण झाले असून, आता जिल्हाधिकारी कार्यालय ‘मिशन मोड’वर काम करणार आहे. खासगी जमिनींबरोबरच केंद्र सरकारच्या मालमत्तांच्या संपादन प्रक्रियेलाही गती दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील उड्डाणपूल उभारणीसंदर्भात घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना ‘शेवटची संधी’ देत संपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच, केंद्र सरकारच्या मालकीच्या जागेबाबत स्वतः पाठपुरावा करण्याची तयारी दर्शविल्याने या प्रकल्पाला नवे बळ मिळाले आहे. या उड्डाणपुलांसाठी केंद्र सरकारने १ हजार २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, शहरातील वाहतूक कोंडी व अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले की, गडकरी यांनी दिलेल्या सूचनांनुसार तीन महिन्यांत संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यापूर्वी काय झाले यापेक्षा आता काय करणार, हे महत्त्वाचे आहे. पुढील १५ दिवसांचे सूक्ष्म नियोजन करून दररोजचे काम निश्चित करण्यात आले आहे. बाधित मालमत्तांची यादी तयार करून अडचणींचा शोध घेतला जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मालमत्तांबाबत संबंधित विभागांची परवानगी घेण्यात येईल, तसेच केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी मुख्य सचिवांमार्फत पाठपुरावा केला जाणार आहे.
---
चौकट...
२४८ पैकी ६५ मालमत्तांचे संपादन...
- पूना नाका ते पत्रकार भवन : १३७ मालमत्तांपैकी १०० खासगी व ३७ शासकीय मालमत्ता आहेत. खासगी १०० पैकी ६५ मालमत्तांचे संपादन पूर्ण तर ३७ शासकीय मालमत्तांचे संपादन प्रक्रियेसाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार.
- बोरामणी नाका ते पत्रकार भवन : १११ मालमत्तांचे संपादन करण्यात येणार आहे, यापैकी ९८ खासगी व १३ शासकीय मालमत्ता आहेत. पूना नाका ते पत्रकार भवन मार्गावरील संपादन अपूर्ण असल्याने बोरामणी नाका ते पत्रकार भवन मार्गावरील संपादन प्रक्रियाच राबविली नाही.
---
चौकट...
अतिक्रमण अन्‌ चुकीच्या परवानग्यांमुळे अडथळे
बोरामणी नाका ते पत्रकार भवन आणि पूना नाका ते पत्रकार भवन या दोन्ही मार्गांवर २४८ मालमत्ता आहेत. यामध्ये १९८ पैकी ६५ खासगी मालमत्तांचे संपादन पूर्ण झाले आहे. असे असले तरी, अनेक इमारती अतिक्रमित आहेत. काही इमारतींना चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानगी दिल्याने संपादन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मोबदला देताना महापालिकेनेही हात आखडता घेतल्याचे समजते. अतिक्रमित इमारतींना मोबदला द्यायचा का, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. यावर तोडगा काढण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com