गारवा कार्यक्रम बातमी

गारवा कार्यक्रम बातमी
Published on

सोलापूर : सोलापूर इन्फ्रास्ट्रक्चरचे राहुल बुऱ्हाणपुरे यांचा सत्कार करताना गायक मिलिंद इंगळे व सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील. (दुसऱ्या छायाचित्रात) एम. एस. ऑर्थोपेडिक्सचे डॉ. निखिल गद्रे यांचा सत्कार करताना.

‘गारवा’च्या काव्यमयी सुरांनी सोलापूरकर रसिक तृप्त
‘सकाळ’ आयोजित ‘गारवा हवाहवासा’ कार्यक्रमास रसिकांचा भरभरून प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : ‘गारवा’च्या सुरांनी दोन पिढ्यांना पुन्हा एकदा एकाच भावविश्वात आणत सोलापूरकर रसिकांना प्रेम, विरह, पाऊस आणि आठवणींच्या गारव्यात चिंब भिजवले. कॅसेटच्या काळात तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ‘गारवा’ची गाणी आजच्या जेन-झी पिढीनेही तितक्याच उत्स्फूर्तपणे अनुभवली. ‘सकाळ’ आयोजित ‘गारवा हवाहवासा’ या मैफलीत गायक-संगीतकार मिलिंद इंगळे यांच्या सुरांना कवी व अभिनेते सौमित्र यांच्या काव्याची आणि निवेदिका डॉ. समिरा गुजर-जोशी यांच्या ओघवत्या निवेदनाची साथ लाभली. ‘गारवा हवाहवासा...’, ‘मन उधाण वाऱ्याचे...’ यांसह गझल, कविता, किस्से आणि रसिकांच्या फर्माइशींनी रंगलेली ही मैफल शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूरकरांना खिळवून ठेवणारी ठरली.
‘सकाळ’ आयोजित व टायटल स्पॉन्सर एम. एस. ऑर्थोपेडिक्सचे डॉ. निखिल गद्रे, पॉवर्ड बाय राहुल बुऱ्हाणपुरे यांचे सोलापूर इन्फ्रास्ट्रक्चर या प्रायोजकांच्या सहकार्यातून ‘गारवा हवाहवासा’ या कार्यक्रमाचे हुतात्मा स्मृती मंदिरात मंगळवारी (ता. २५) आयोजन करण्यात आले होते. हलक्याशा का होईना, पावसाचे सोलापुरात झालेले आगमन आणि निसर्गाचे बदलणारे रूप यामुळे सोलापूरकर रसिकांना वेगळाच अनुभव मिळाला. मुळात गारवा हा संपूर्ण कार्यक्रम प्रेमातील आतुरता आणि विरहाच्या हळुवार भावविश्वावर आधारित आहे. कॅसेटच्या युगापासून यूट्यूबपर्यंत आजही तो तितकाच हवाहवासा वाटणारा हा कार्यक्रम सोलापूरमध्ये पहिल्यांदाच झाला.
‘गारवा हवाहवासा, असा हा गारवा...’, ‘मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे...’ या आणि अनेक गीतांनी ही मैफल रंगली. या कार्यक्रमाच्या निर्मितीचे रंजक किस्से डॉ. समिरा गुजर-जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान कवी सौमित्र यांनी आपल्या खास शैलीत काव्यवाचन करत प्रत्येक गाण्यामागील आठवणी आणि किस्से उलगडले. निवेदिका समिरा यांनी आपल्या ओघवत्या व लालित्यपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाची वीण घट्ट बांधून ठेवली. मिलिंद इंगळे यांच्या सुमधुर गायकीने सभागृहात खरोखरच पावसाळी वातावरणाचा आनंद निर्माण झाला. प्रेक्षकांनी प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून प्रतिसाद दिला.
सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी ‘सकाळ’ची आतापर्यंतची वाटचाल आणि भूमिका मांडली. या कार्यक्रमासाठी मुख्य व्यवस्थापक (जाहिरात आणि इव्हेंट) अभयकुमार सुपाते, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) संतोष सावळगी, व्यवस्थापक सुदर्शन क्षीरसागर, व्यवस्थापक (वितरण) विजय पवार, उपव्यवस्थापक अजय धाराशिवकर, सिनिअर एक्झिक्युटिव्ह महेश भुयार व संतोष चंदेले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सहाय्यक व्यवस्थापक नीलम भोसले यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या मध्यंतरानंतर प्रायोजक डॉ. निखिल गद्रे आणि राहुल बुऱ्हाणपुरे यांचा मिलिंद इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबरोबरच अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. गायक मिलिंद इंगळे, किशोर कदम व समिरा गुजर-जोशी यांच्यासह सहकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

उत्कृष्ट तांत्रिक संयोजन
कार्यक्रमाच्या प्रत्येक गीतादरम्यान मागील बाजूस एलईडी स्क्रीनवर गाण्याला साजेशी चित्रफीत दाखविण्यात येत होती. यामध्ये विशेषतः मिलिंद इंगळे यांची अनेक गाणी चित्रित केलेली होती. याबरोबरच पाऊस आणि निसर्गाची मोहक दृश्ये पाहून प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले. प्रकाश व उत्कृष्ट ध्वनी संयोजन केले.

किशोरकुमारांची गाणी अन्‌ श्रोत्यांच्या फर्माइशी
कवी सौमित्र यांच्या संवेदनशील कवितांना मिलिंद इंगळे यांच्या सुरेल सुरांनी अजरामर केलेली अनेक गीते या कार्यक्रमात रसिकांनी अनुभवलीच; पण याबरोबरच उर्दू, मराठी गझल आणि किशोरकुमार यांच्या अनेक गीतांच्या रसिकांच्या फर्माइशी त्यांनी पूर्ण केल्या. यावेळी प्रत्यक्ष रंगमंचावरून खाली येत श्रोत्यांच्या रांगेत जाऊन त्यांनी अनेक गीते सादर केली.

सासुरवाडीत जावयाचे कौतुक
कवी सौमित्र हे सोलापूरचे जावई असल्याने निवेदिका समिरा गुजर-जोशी आणि मिलिंद इंगळे यांनी त्यांना अनेक वेळा छेडले. यावर सौमित्र यांनीही ‘सासुरवाडीला इंप्रेस करण्याची संधी मी कशाला सोडू?’ असे म्हणत अनेक वेळा विनोदनिर्मिती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com