

२० मिनिटांच्या पावसाने सोलापूरच्या रस्त्यांवर पाणीच पाणी
शहरासह ग्रामीण भागात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; मंगळवारी रात्री सर्वत्र पाऊस
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर गेली दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मंगळवारी रात्री साडेनऊनंतर १५ ते २० मिनिटे मेघगर्जनेसह सोलापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने काही मिनिटांतच सखल भागासह सर्वत्र पाणी साचले. पंढरपूर शहर व तालुक्यातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून, रब्बी हंगामाच्या पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. खरीप हंगाम जवळपास वाया गेल्याने शेतकऱ्यांचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले होते. या पावसाचा खरीप हंगामातील तूर पिकाला लाभ होणार असला, तरी इतर पिकांचे नुकसान भरून येणार नाही. सोमवारी व मंगळवारी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगाम, पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.
विजांच्या कडकडाटात पाऊस
नातेपुते : नातेपुते शहर व परिसरात दिवसभर कडाक्याचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चौकट...
पंढरपूर तालुक्यात दमदार हजेरी...
सोमवारी सायंकाळी काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मंगळवारी दुपारनंतर ढग दाटून येत जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागात सुमारे एक ते दीड तास पाऊस झाला. उपरी, वाखरी, भंडीशेगाव, गादेगाव, टाकळी, गोपाळपूर यासह तालुक्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. ओढे-नाले वाहू लागले असून, शेतांमध्ये पाणी साचले आहे.