

PNE26W66666 : सोलापूर : महापालिकेतील बैठकीप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदी.
--------------
उड्डाणपुलाचा आराखडा ठरतोय नंदीध्वज मिरवणुकीच्या मार्गात अडथळा!
सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याची आमदार विजयकुमार देशमुख यांची सूचना
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या नंदीध्वज मिरवणुकीच्या मार्गात प्रस्तावित उड्डाणपुलामुळे अडथळा निर्माण होणार आहे. मेकॅनिक चौक ते शिवाजी चौक या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे नंदीध्वजांना मार्ग मिळणार नसल्याने याबाबत तातडीने सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना केली.
महापालिकेत आमदार देशमुख यांनी आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्यासोबत बैठक घेतली. श्री सिद्धेश्वर यात्रेदरम्यान सलग दोन दिवस धार्मिक विधी आणि कार्यक्रम होतात. यण्णिमज्जन आणि अक्षता सोहळ्याच्या दिवशी नंदीध्वजांची भव्य मिरवणूक काढण्यात येते. शहरातून सुमारे २१ किलोमीटर मार्गावरून निघणाऱ्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. मिरवणुकीतील नंदीध्वजांची उंची सुमारे ३५ फूट आहे.
मेकॅनिक चौक ते शिवाजी चौक या दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने नंदीध्वजांना अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच पुलाची रुंदी परिसरातील मिळकतींना अगदी लागून जात असल्याने मिरवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच फूट जागा सोडण्याचा विचार करून उड्डाणपुलाच्या आराखड्यात आवश्यक बदल करावेत, पर्यायी व्यवस्था करावी आणि मिरवणूक मार्गाची पाहणी करावी, अशी सूचना देशमुख यांनी केली. यासाठी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यासही त्यांनी सांगितले.
बैठकीत शहरातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरही चर्चा झाली. विविध भागांतून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची तपासणी करावी, गळती शोधून दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या. शहरातील जलवाहिन्यांच्या गळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शहरातील २५६ गाळ्यांचे पाडकाम करून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.
या वेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक शिवानंद पाटील, अलका भंवर, सार्वजनिक अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.