तालुक्यात भाजप विरोधी आघाडीची तयारी ,  ‘ बाण , मशाल, घड्याळ, पंजा सगळेच एकत्र ’

तालुक्यात भाजप विरोधी आघाडीची तयारी , ‘ बाण , मशाल, घड्याळ, पंजा सगळेच एकत्र ’

Published on

उत्तर तालुक्यात भाजप विरोधी आघाडीची तयारी
बाण , मशाल, घड्याळ, पंजा सगळेच एकत्र

उ. सोलापूर, ता. १७ : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून इतर पक्षांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये शिवसेनेचे दोन्ही गट व राष्ट्रवादीचे दोन्ही गट सामील असून इतरही काही घटकांना सोबत घेण्याची चाचपणी सुरू आहे. मात्र यापूर्वीचा अनुभव पाहता ही प्रस्थापितांच्या विरोधातील चळवळ होणार की नुसतीच वळवळ हे येत्या चार दिवसात कळणार आहे.
माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तालुक्यातील एकूण राजकीय गणिते बदलली आहेत. तालुक्यात भाजपचे नेते शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप व दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वातील भाजप याचबरोबर आता माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांची भर पडली आहे. शहाजी पवार यांचे बंधू माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित पवार यांनी यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर केली आहे तर माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने यांची कोंडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी पक्की असल्याचा दावा समर्थक करत आहेत. तालुक्यात भाजपच्या या वाढलेल्या प्रभावाला विरोधी पक्षातील घटक स्वतंत्रपणे विरोध करू शकत नाही. यामुळे विरोधी पक्षाने एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. या आघाडीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बळीराम साठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भारत जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पोळ, शरद पवार गटाचे नूतन तालुका अध्यक्ष तुषार साठे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजेंद्र शिंदे यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. ही सर्व तोंडे एकत्र आल्यास भाजपला चांगला प्रतिकार करू शकतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र आघाडीतील काही नेत्यांचे गाव पातळीवरील वैर एकत्र येण्यापासून रोखत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विरोधी पक्षाची भाजपच्या विरोधातील ही मोट तयार होणार का हे येत्या गुरुवारपर्यंत स्पष्ट होणार आहे.


चौकट
भाजपच्या जागा वाटपाकडे लक्ष
तालुक्यात भाजपची अवस्था पूर्वीच्या काँग्रेस प्रमाणे झाली आहे. पक्षाच्या प्रांतिक समितीचे सदस्य शहाजी पवार, माजी आमदार दिलीप माने व दक्षिण उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख असे तीन गट सध्या भाजपमध्ये आहे. यांच्या समर्थकांकडून समाज माध्यमांवर उमेदवाऱ्या घोषित होत आहेत. मात्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारी अद्याप घोषित झाल्या नाही. यासंदर्भात नेते मंडळीची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रविवारी (ता. १८) इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com