

‘आमच्या सोसायटीत साळिंदर आले आहे’
वन विभागाकडे वाढले ‘कॉल’; सोलापूर शहरात वावर वाढला
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : एकेकाळी केवळ रानावनात आढळणारा ‘साळिंदर’ हा प्राणी आता सोलापूर शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये आपला अधिवास टिकवून आहे. ‘आमच्या सोसायटीत साळिंदर आले आहे’, असे ‘फोन कॉल’ वन विभागाकडे वारंवार येत आहेत. हा प्राणी निरुपद्रवी असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
शहरातील डीमार्ट परिसर (जामगुंडी मंगल कार्यालय), अशोक चौक जलतरण तलाव, शेळगी, सह्याद्रीनगर, कंबर तलाव आणि यलगुलवार शाळेजवळ साळिंदराचा वावर असल्याचे समोर आले आहे. साळिंदराला पकडून शहराबाहेर सोडावे, अशी मागणी नागरिकांकडून होत असली, तरी वन विभागाने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सहअस्तित्व जपण्याचे आवाहन केले आहे. साळिंदर मानवी वस्तीत राहून कोणालाही उपद्रव करत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, त्याला इजा न पोहोचवता आपल्या परिसरात शांततेने राहू द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
चौकट...
साळिंदराबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
- भित्रा व निशाचर प्राणी : साळिंदर हा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणारा आणि माणसाला कमालीचा घाबरणारा प्राणी आहे. तो स्वतःहून कोणावरही हल्ला करत नाही किंवा काटे फेकत नाही.
- वन विभागाचे धोरण : साळिंदराला पकडून नवीन अनभिज्ञ अधिवासात सोडल्यास त्याचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे वन विभागाने त्याला रेस्क्यू करून बाहेर सोडण्याऐवजी, आहे तिथेच सुरक्षित राहू देण्यावर भर दिला आहे.
- वाढती संख्या : साळिंदर एकावेळी ३ ते ४ पिल्लांना जन्म देतो. शहरात नैसर्गिक शत्रूंची संख्या कमी असल्याने त्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
- आत्मरक्षणात सक्षम : केवळ कुत्रे किंवा लांडगे कळपाने आले तरच साळिंदरावर हल्ला करू शकतात; एकटा-दुकटा प्राणी याच्यावर हल्ला करू शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.