

एमआयडीसी परिसरातील
५१ व्यक्तीची आत्महत्या
सोलापूर : येथील एमआयडीसी परिसरातील हंचाटे शाळेजवळील नितीननगर परिसरातील ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय गणपत धुमाळ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय यांनी बुधवारी (ता. १९) दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला. पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांनी संजय यांना बेशुद्धावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
--------------------
विवाहितेने प्राशन केले
उंदीर मारण्याचे औषध
सोलापूर : राहत्या घरी असताना एका २३ वर्षीय विवाहितेने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अपर्णा विकी गायकवाड (वय २३) असे त्या विवाहितेचे नाव आहे. मजरेवाडी येथील शांती नगरात राहायला असलेल्या अपर्णा यांनी अज्ञात कारणातून गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरी असताना औषध प्राशन केले. यात काहीवेळाने त्यांना त्रास होऊ लागला आणि पतीने अपर्णास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
--------------------
दुचाकी घसरून झालेल्या
अपघातात महिला जखमी
सोलापूर : देशमुख वस्ती ते केगाव या रोडने जात असताना डेंटल कॉलेजसमोरील रस्त्यावर दुचाकी घसरून महिला जखमी झाली. हात बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. तमन्ना विठ्ठल वाघमारे (वय ४०, रा. देशमुख वस्ती) असे जखमी महिलेचे नाव आहे. तमन्ना या बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून केगावकडे जात होत्या. त्या डेंटल कॉलेजसमोरील रस्त्यावरून जात असताना अचानक त्यांची दुचाकी घसरली आणि त्या रस्त्यावर पडल्या. यात त्यांच्या खांद्याला, पायाला खरचटले असून डोक्याला देखील मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
-----------------
दोन दुचाकींचा अपघात;
५६ वर्षीय व्यक्ती जखमी
सोलापूर : विजापूर रोडवरील रेवणसिध्देश्वर नगर येथे जात असताना आधार हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर झालेल्या दुचाकींचा अपघात झाला. यात धुळप्पा माणिकराव बिराजदार (वय ५६, रा. रेवणसिध्देश्वर नगर) हे जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून धुळप्पा हे सात रस्ता येथून रेवणसिध्देश्वर नगराकडे जात होते. ते आधार हॉस्पिटलसमोर आले असता, समोरून आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात धुळप्पा यांच्या खांद्याला मार लागला असून पायाला देखील जखम झाली आहे. जखमीचा मुलगा सुरज याने धुळप्पा यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
-------------------------
सासूसोबत वाद झाला;
सुनेने प्राशन केले फिनेल
सोलापूर : सासूसोबत घरगुती कारणातून झालेल्या वादानंतर सुनेने फिनेल प्राशन केले. आरती ऋषिकेश फलमारी (वय २३) असे त्या विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी सकाळी आरती यांची सासूसोबत घरगुती कारणातून तक्रार झाली. त्या रागातून आरती यांनी घरातील फिनेल प्राशन केले. यात काही वेळाने त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या पतीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
--------------------
आसरा चौकात एकास
रॉडने जबर मारहाण
सोलापूर : आसरा चौकातील मुर्तुज दाल- चावलसमोर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एकास लोखंडी रॉडने जबर मारहाण झाली. विक्रांत तिमण्णा कोळी (वय ४६) असे मारहाणीत जखमचे नाव आहे. विक्रांत हे गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास आसरा चौकातील मुर्तुज दाल- चावलसमोर थांबले होते. यावेळी निलेश बसवराज अमदीपरू व इतर पाच जण तेथे आले. त्यांनी कोणतेही कारण नसताना विक्रांत यांना रॉडने आणि लाकडाने मारहाण केली. यात विक्रांत यांच्या डोक्याला जखम झाली असून हातालाही जखम झाली आहे. ते स्वत: उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
------------------
शेतात काम करताना महिलेस
कोल्ह्याने घेतला चावा
सोलापूर : शेतात काम करताना कोल्ह्याने चावा घेतल्याने मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी येथील महिला जखमी झाली. बहीना प्रदिप गायकवाड (वय २३) असे त्या महिलेचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास बहिना या हिंगणी निपाणी परिसरातील शेतात काम करत होत्या. त्यावेळी कोल्ह्याने त्यांच्या उजव्या पायाला चावा घेतला. यात जखम झाल्याने मोहोळच्या सरकारी रुग्णालयातून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
---------------------
वळसंग शिवारात
दोघांना मारहाण
सोलापूर : वळसंग शिवारातील आकरा मशिदीजवळ दोघांना दहा जणांच्या जमावाने मारहाण केली. या मारहाणीत सलीम वजी तांबोळी (वय ३५) व सोहेल अल्लाउद्दीन कटरे (वय २३, दोघेही रा. वळसंग) हे जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सलीम आणि सोहेल हे आकरा मशिदीजवळ होते. त्यावेळी तेथे ८ ते १० जणांचा जमाव आला. त्यांनी या दोघांना अज्ञात कारणातून लाथाबुक्यांनी मारहाण करून कोयत्यानेही वार केला. यात सर्वांगास मुकामार लागल्याने त्या दोघांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.