

दहा महिन्यांत ९७७ अपघातात ६०० जण ठार
ग्रामीणमधील ११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रमाण अधिक; सोलापूर शहरात ६९ मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २७ : ओव्हरस्पीड, अनोळखी रस्ते, महामार्गांवर थांबलेली वाहने, रस्ता क्रॉस करणारा पादचारी, रस्त्यांवर न दिसणारा गतिरोधक, लेन कटिंग आणि डोक्यावर हेल्मेट नाही, अशी अपघाताची प्रमुख कारणे आहेत. सोलापूर शहर-जिल्ह्यात १० महिन्यांत ९७७ अपघातात तब्बल ६०० जण ठार झाले आहेत. माढा, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, मंगळवेढा, करकंब, पंढरपूर तालुका व ग्रामीण, कामती व कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात व मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची नोंद ‘आरटीओ’कडे आहे.
सोलापूर शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे मागच्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात ६५ अपघातात ६७ जणांनी जीव गमावला होता. १० महिन्यांत ६६ अपघातात ६९ जणांचा जीव गेला आहे. पहिल्या नऊ महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत अपघात व मृत्यू कमी होते, पण ऑक्टोबरमध्ये यात वाढ झाली. सोलापूर शहराच्या हद्दीत सर्वाधिक १८ ब्लॅकस्पॉट आहेत. तरीपण, या ठिकाणी वाहतूक पोलिस दिसत नाहीत, मात्र ते आडोशाला दिसतात. दुसरीकडे ग्रामीण हद्दीतील अनोळखी रस्त्याने जाताना वाहन चालकांचे वेगावर नियंत्रण नसते. महामार्गालगतच्या गावांमधील दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने ये-जा करतात. दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. पादचाऱ्यांना भरधाव वाहनांचा अंदाज नसतो. यामुळे अपघात व अपघाती मृत्यू वाढल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
------------------------
चौकट
१९० जणांचे लायसन्स निलंबित
मद्यपान करून वाहन चालवणे, मोबाईल टॉकिंग, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, माल वाहतूक, ट्रिपल सीट, ओव्हरस्पीड अशा बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांकडून दररोज कारवाई केली जात आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात दररोज सुमारे दीड हजार बेशिस्त वाहनचालकांना २० ते २५ लाख रुपयांचा दंड केला जात आहे. दुसरीकडे १ जानेवारीपासून ३० सप्टेंबरपर्यंत वारंवार दंडात्मक कारवाई करूनही किंवा निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या १९० वाहनचालकांचे लायसन्स ‘आरटीओ’ने निलंबित केले आहेत.
--------------
दोन वर्षातील तुलनात्मक स्थिती
जानेवारी ते सप्टेंबर २०२५
एकूण अपघात
९७३
एकूण मृत्यू
५९७
अपघातात जखमी
१,१४५
-----------------------
जानेवारी ते सप्टेंबर २०२६
एकूण अपघात
९२८
एकूण मृत्यू
५७९
अपघातात जखमी
१,०२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.