

(वास्तव वेध; प्रभाग १६)
प्रभाग १६
-------------------
घशाला कोरड, घरासमोर ड्रेनेजचे पाणी, रस्तेही उखडलेले
सहा दिवसांतून येते पिण्याचे पाणी, तेही कमी दाबाने; जागोजागी कचऱ्याचे ढिग
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येकांनी नागरिकांना नियमित पाणी देण्याची ग्वाही दिली, मात्र अजूनही नागरिकांना पाच-सहा दिवसांतून एकदा पाणी मिळते. प्रभाग १६ मधील नागरिकांना कमी दाबाने पाणी येते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोर प्लास्टिकचे बॅरल पाहायला मिळतात. घरासमोर ड्रेनेजच्या पाण्याचा डोह, रस्ते उखडलेले अशी या प्रभागातील बहुतेक नगरांची सद्यःस्थिती आहे.
गणपती मंदिर ते साईबाबा चौक, तेथून चलवादी चाळ, श्रीराम हॉस्पिटलजवळील बोळातील दोन चाळींमधील सुमारे १०० कुटुंबांना कमी दाबाने अथवा पाणीच मिळत नाही. त्यांच्यासाठी मनपाकडे टँकरची मागणी केली, पण टँकर मिळाला नाही. तसेच प्रभागातील मोदी ८५ नंबर गाळा परिसरातील नवोदित नगरातील दोन गल्ल्यांमध्ये पिण्याचे पाणीच पोचत नाही. दुसरीकडे चिंतलवार वस्ती, जगजीवनराम झोपडपट्टी (मोदी परिसर), मौलाली चौक, कुरेशी गल्ली, सात रस्ता परिसरातील म्युनिसिपल कॉलनी, जगदंबा चौक, चुना भट्टी परिसर, केशव नगर, शामा नगर, गुलाब नगर येथील नागरिकांचीदेखील हीच समस्या आहे. रस्त्यांलगतच कचऱ्याचे ढिग पाहायला मिळतात. नेहमीच ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसते. प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले असून अंतर्गत रस्तेदेखील उखडलेले पाहायला मिळाले.
-------------------------------------
कोट:PNE26W19348
प्रभागात बहुतेक भागाला कमी दाबाने पाणी मिळते. ज्या दिवशी पाणी येते, त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर, घरासमोर तुंबलेल्या ड्रेनेजचे पाणी साचलेले दिसते. रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. यासाठी महापालिकेला कामे सुचविली आहेत, पण निधी अजून मंजूर झालेला नाही. दररोज नागरिक त्यांच्या मूलभूत समस्या घेऊनच आमच्याकडे येतात, पण निधी न मिळाल्याने त्यांचे प्रश्न सोडविता आलेले नाहीत.
- नरसिंह आसादे, नगरसेवक
----------------------------
PNE26W19336
प्रभागातील गणपती मंदिर ते साईबाबा चौक, तेथून चलवादी चाळ, श्रीराम हॉस्पिटलजवळील बोळातील चाळींमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. या नागरिकांसाठी मी स्वतः पाण्याची सोय केली आहे. ड्रेनेजदेखील नेहमीच तुंबलेले असते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याला ड्रेनेजच्या पाण्याचा वास येतो. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दररोज पाच ते सहा ठिकाणी भेटी देतो. प्रभागातील प्रश्न जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे.
- श्वेता खरात, नगरसेविका
----------------------------
चौकट
नगरसेवक म्हणतात, कामे सुचविली पण निधी नाही
काँग्रेसचे नरसिंह आसादे, शिवसेनेचे प्रियदर्शन साठे आणि भाजपकडून कल्पना कदम व श्वेता खरात हे प्रभाग १६ चे नगरसेवक आहेत. निवडणुकीनंतर बजेट झाले, नगरसेवकांना कामे सुचवायला सांगितले. त्यानुसार नगरसेवकांनी आपापल्या भागातील नागरिकांच्या समस्या तथा कामे महापालिकेकडे सुचविली आहेत. पण, अजूनही ना कामांना मंजुरी ना निधी मिळाला, असे गाऱ्हाणे नगरसेवकांनी ‘सकाळ’कडे मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.