

Tanker आजच्या तारखेत संग्रहित छायाचित्र सेव्ह आहे.
---
लोगो : दुष्काळाचे संकट गडद
---
गावे तहानलेली... शहरांनाही टँकरचा आधार
जिल्ह्यात ९५५ टँकर प्रस्तावित; ७८७ विहिरी अधिग्रहितसह नवीन विंधन विहिरींचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, ग्रामीण भागासह शहरी भागांनाही त्याची झळ बसू लागली आहे. जिल्ह्यातील तब्बल ६९५ गावांतील २ हजार ५५५ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ९५५ टँकर प्रस्तावित केले आहेत. दुसरीकडे बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ, अनगर, मंगळवेढा, करमाळा आणि वैराग यांसह १२ नगरपालिकांमध्येही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यंदा ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीटंचाईचे संकट गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी विशेष टंचाई आराखडा तयार केला आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी ९५५ टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ७३५ गावांतील वाड्या- वस्त्यांसाठी ७८७ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय २२६ गावांत २४६ विहिरींचे खोलीकरण, २३४ गावांत ४२२ नवीन विंधन विहिरी आणि २०० गावांतील १ हजार ९०९ पाणीस्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. तसेच ३९ गावांतील ७१ वाड्या- वस्त्यांसाठी ३९ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित आहे.
---
मंगळवेढा, सांगोल्यात सर्वाधिक टंचाई
सध्या मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावांत ५८, तर सांगोला तालुक्यातील ३३ गावांत ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. माढा तालुक्यात २२, तर मोहोळ तालुक्यात १७ टँकर सुरू आहेत. याशिवाय अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा आणि मोहोळसह १२ नगरपालिकांमध्ये सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागासह शहरांनाही दुष्काळाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
---
२०१२-१३ मध्ये ६७५ टँकरचा आधार
सोलापूर जिल्ह्याने यापूर्वीही भीषण पाणीटंचाईचा सामना केला आहे. २०१२-१३ च्या दुष्काळात जिल्ह्यात तब्बल ६७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. आता पुन्हा ९५५ टँकरचे नियोजन करण्याची वेळ आल्याने टंचाईची तीव्रता अधोरेखित होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अटी व निकष पूर्ण करणाऱ्या गावांनाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. यंदा मात्र जिल्ह्यात टँकरची संख्या सर्वोच्च पातळीवर जाण्याचा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.