

(महापालिकेचा लोगो टाकावा)
विकासकामांवरील निर्बंधांचा २२५ रस्ते कामांना फटका
एसटीपीच्या पाण्यामुळे दिलासा मिळणे शक्य; दररोज १०० एमएलडी पाणी उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अधिक वापर होणाऱ्या विकासकामांना शासनाने निर्बंध घातले आहेत. शहरातील काँक्रीट रस्ते आणि गटारींच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. साधारण २२५ रस्ते कामांना ब्रेक लागणार आहे. मात्र महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (एसटीपी) दररोज प्रक्रिया करून नाल्यात सोडण्यात येणाऱ्या १०० एमएलडी पाण्याचा वापर केल्यास या विकासकामांना मोठा आधार मिळू शकतो. प्रक्रिया केलेले पाणी रस्त्यांची कामे तसेच बांधकाम क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिल्यास पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी होऊन विकासकामांचा वेग कायम ठेवता येऊ शकतो.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या कामांना प्रशासकीय मान्यता देताना निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेल्या साधारण २२५ काँक्रीट रस्ते आणि गटारींच्या कामांऐवजी कमी पाणी लागणारी पर्यायी कामे सुचविण्याबाबत महापालिकेने पत्र दिले आहे. परिणामी, शहरातील प्रस्तावित विकासकामांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पातून दररोज १०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे प्रक्रिया केलेले पाणी सध्या नाल्यात सोडले जाते. या पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन केल्यास शहरातील काँक्रीट रस्त्यांची कामे, बांधकामांमध्ये पाणी वापरणे शक्य होऊ शकते. विशेषतः बांधकामानंतर काँक्रीटच्या देखभालीसाठी लागणारे पाणी प्रक्रिया केलेल्या स्रोतामधून उपलब्ध झाल्यास पिण्याच्या पाण्याची बचत होईल.
सोलापूरचा एसटीपी प्रकल्प राज्यातील उल्लेखनीय प्रकल्पांपैकी एक असल्याने त्यातून उपलब्ध होणाऱ्या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा विकासकामांसाठी उपयोग करण्याची संधी आहे. त्यासाठी पाण्याची गुणवत्ता, आवश्यक वाहतूक व्यवस्था आणि वितरणाचे नियोजन करणे गरजेचे आहे. विकासकामांना ब्रेक लावण्याऐवजी उपलब्ध पर्यायी जलस्रोताचा वापर केल्यास दुष्काळी परिस्थितीतही शहराच्या विकासकामांना आधार मिळू शकतो.
---
आकडे बोलतात
देगाव : ७५ एमएलडी
प्रतापनगर : १५ एमएलडी
कुमठा : १२ एमएलडी
---
महापालिकेचे एसटीपी प्रकल्पातून दररोज १०० एमएलडी पाणी उपलब्ध होते. एकूण क्षमता ही १०२ इतकी आहे. शहरातील रस्ते, बागा, बांधकाम आदी कामांसाठी वापरता येऊ शकते. तसेच टँकर भरण्याची व्यवस्था देखील उपलब्ध आहे.
- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता
----
यंदा कमी पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे वापरण्यासाठी आवश्यक असलेले पाणी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून वापरावे. एसटीपीमधून प्रक्रिया केलेल्या पाण्यातून रस्ते धुणे, उद्यानांची देखभाल, वृक्षलागवड, सार्वजनिक स्वच्छता आणि वाहन धुलाई अशा बिगर-पिण्याच्या कामांसाठी वापरात येऊ शकतो. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन करावे, असे पत्र आयुक्त आणि आठही विभागीय अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहे. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करू.
- रंजिता चाकोते, स्थायी समिती सभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.