सोलापुरात उद्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव

सोलापुरात उद्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव
Published on: 

सोलापुरात उद्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव
विविध स्पर्धांसाठी आकर्षक पारितोषिके; अर्जासाठी आज शेवटची संधी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटांतील युवक-युवतींसाठी बुधवारी (ता. १८) सकाळी नऊ वाजता सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभागृहात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, पथनाट्य, काव्यलेखन आणि चित्रकला या स्पर्धा होणार आहेत.
लोकनृत्य व लोकगीत स्पर्धेसाठी प्रत्येकी सात मुख्य सदस्य व तीन सहायक सदस्य असतील. या दोन्ही स्पर्धांसाठी सादरीकरणाचा कालावधी पाच ते आठ मिनिटे असेल. पथनाट्य स्पर्धेसाठी दहा सदस्य असून, सादरीकरणासाठी एक ते सात मिनिटांचा कालावधी असेल. काव्यलेखनासाठी एका स्पर्धकाला दीड तास, तर चित्रकलेसाठी दोन स्पर्धकांना सहा तासांचा कालावधी देण्यात येणार आहे.
लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सात हजार, द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार आणि तृतीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये पारितोषिक आहे. लोकगीत व पथनाट्य स्पर्धेसाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि अडीच हजार रुपये, तर काव्यलेखन व चित्रकला स्पर्धेसाठी तीन हजार, दोन हजार आणि दीड हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.
एका युवकाला केवळ एका स्पर्धा प्रकारात सहभागी होता येईल. त्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज शाळा, महाविद्यालय किंवा संस्थाप्रमुखांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह १७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावेत. अर्ज jilhayuwamahotsav@gmail.com या ई-मेलवरही पाठविता येतील. मात्र, मूळ अर्ज स्पर्धेच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. सहभागी स्पर्धकांसाठी नियमानुसार प्रवास भत्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
---
चौकट
‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ हा विषय
सर्व सांस्कृतिक स्पर्धांसाठी ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धकाचे वय १७ नोव्हेंबर २०२६ रोजी १५ ते २९ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. जन्मतारीख १८ ऑगस्ट १९९७ ते १७ ऑगस्ट २०११ या कालावधीतील असावी. स्पर्धकांनी दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र आणि आधार कार्डची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच माय भारत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी https://mybharat.gov.in/yuva_register या संकेतस्थळाचा वापर करावा.