सातारारोड शाळांसाठी प्रसाधनगृहे व सोलर
शाळांवर सोलर यंत्रणा उभारावी
शशिकांत शिंदे; विधान परिषदेत शिक्षण विभागाच्या प्रश्नांवर चर्चा
सातारारोड, ता. ५ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, शासकीय किंवा अनुदानित, विनाअनुदानित शाळांपैकी अनेक शाळांमध्ये अजूनपर्यंत १०० टक्के स्वच्छतागृहे नाहीत, प्रत्येक शाळेमध्ये प्रसाधनगृह असले पाहिजे, किमान महिला व मुलींसाठी ते असलेच पाहिजे. त्याची व्यवस्था करण्याचे काम शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सरकार करत असून, ते येणाऱ्या आठ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शाळा लवकरात लवकर सोलरवर कशा करता येतील, याचाही प्रयत्न शासन करेल, असे उत्तर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर दिले.
शाळांमध्ये विशेषतः महिला व मुलींसाठीच्या प्रसाधनगृहांचा तसेच सोलर यंत्रणेचा मुद्दा आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘राज्यातील एक हजार १६४ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे नाहीत. त्यामध्ये शासकीय शाळा एक हजार ४३, खासगी अनुदानित ६४, खासगी विनाअनुदानित २० आणि स्वयंअर्थसहाय्यित ३७ शाळांचा समावेश आहे. यासंदर्भात शासनाने केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरले आहे. शिक्षण सचिवांनीच बैठकीत सांगितले होते, की कमतरतेचा अहवाल आला असून, एका महिन्यात व्यवस्था केली जाईल. मात्र, अद्यापही पूर्तता झाली नाही. सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे किती दिवसांत करणार? प्रत्येक शाळेला सोलर यंत्रणेसाठी तरतूद करणार का तरतूद का?’’
त्यावर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, ‘‘आमदार शशिकांत शिंदे यांनी वस्तुस्थितीला धरून हा प्रश्न उपस्थित केला आहे. हे खरे आहे, की प्रत्येक शाळेमध्ये प्रसाधनगृह असले पाहिजे, किमान महिला व मुलींसाठी ते असलेच पाहिजे. त्याची व्यवस्था करण्याचे काम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सरकार करत आहे. त्याचबरोबर अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये संबंधित संस्थेने ही सुविधा करणे अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. आता चालू शैक्षणिक वर्षामध्ये मुलींसाठी एक हजार ९८ आणि मुलांसाठी एक हजार ६६५ स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरू आहे आणि येणाऱ्या आठ मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.’’ सोलर यंत्रणेच्या मुद्द्यावरून डॉ. भोयर म्हणाले, की जिल्हा नियोजन समितीमध्ये पाच टक्के निधी राखीव असून, त्या व्यतिरिक्त ‘मेडा’च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक शासकीय इमारत प्राधान्याने सोलरवर घेण्याची सूचना केली आहे. आता आम्ही विनंती करू, की शासकीय इमारती संपल्यानंतर सरकारी शाळांवर सोलर बसवण्यासाठी प्राधान्य द्यावे. नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा सोलरवर झाल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शाळा लवकरात लवकर सोलरवर कशा करता येतील, याचा प्रयत्न शासन करेल, असे डॉ. भोयर यांनी सांगितले.
चौकट
आता ‘सीएम श्री’ शाळा योजना सुरू करणार
शशिकांत शिंदे म्हणाले, की हळूहळू शासकीय शाळा बंद पडू लागल्या आहेत आणि सुविधाच दिल्या नाहीत, तर या शाळाच राहणार नाहीत. त्यावर डॉ. भोयर म्हणाले, की ज्या धर्तीवर ‘पीएम श्री’ शाळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळांची निवड करून ‘सीएम श्री’ शाळा ही योजना आपण सुरू करतोय.
----
फोटो- शशिकांत शिंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

