

सोमाटणे ग्राम : लेख ४
तंटामुक्तीच्या दिशेने वाटचाल
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत ग्रामस्तरावर निवडल्या जाणाऱ्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. गावात शांतता राखणे, आपसातील वाद मिटवणे आणि कायदेशीर तडजोड घडवून आणणे, ही त्यांची प्रमुख कामे असतात. यातूनच सोमाटणे गावातील जवळपास २५० प्रकरणे गेल्या १५ वर्षांत आपापसांत मिटवण्यात आली आहेत. यामुळे तंटामुक्त अध्यक्ष म्हणून काम करताना आपणही किती व्यवस्थित राहणे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते.
- विष्णू दत्तोबा मुऱ्हे, तंटामुक्त अध्यक्ष, सोमाटणे
तं टामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील किरकोळ भांडणे, जमिनीचे वाद आणि दिवाणी दावे गावातच बोलावून, संबंधित पक्षांमध्ये आपापसांत चर्चा घडवून आणून सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. सामोपचाराने वाद मिटविणे, ग्रामस्थांमध्ये सलोखा वाढविण्यासाठी बैठका घेणे आणि ग्रामसभेत पारदर्शक पद्धतीने निर्णय घेणे, ही समितीची महत्त्वाची कामे आहेत. दोन पक्षांमधील वाद मिटल्यानंतर त्यांच्यात लेखी समझोता किंवा तडजोडनामा तयार करून त्यावर संबंधितांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येतात. अशा विविध माध्यमांतून गावातील तंटे मिटविण्याचे काम केले जाते.
अडीचशे प्रकरणे सोडविण्यात यश
२०१० मध्ये माझी सोमाटणे गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी गावची लोकसंख्या खूपच कमी होती. त्यामुळे सहसा वाद-तंटे अशा गोष्टींचा अनुभव आला नाही. मात्र, गेल्या दहा वर्षांत सोमाटणे गावची वाढलेली वसाहत आणि सोसायट्या पाहता, ही लोकसंख्या २५ ते ३० हजारांपर्यंत पोहोचली आणि गावातील वाद-विवादांची संख्याही वाढत गेली. या दहा वर्षांत जवळपास गावातील २५० प्रकरणे सोडविण्यात यश आले. हे सर्व करत असताना गावातील तरुण, ज्येष्ठ व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
संशयावरील वादाच्या प्रमाणात वाढ
गावातील कौटुंबिक वाद, जमिनीशी निगडित वाद, बांधावरून होणारे वाद, सोसायटीमधील वाद, देणे-घेणे यावरून होणारे वाद, व्यवहारातून निर्माण झालेले वाद, शासकीय कामावरून होणारे वाद, तसेच अंतर्गत केलेल्या कामावरून निर्माण झालेले वाद अशा विविध प्रकारच्या समस्या तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत. नवीन तरुण मुलांचे सध्याचे वाद तर वेगळेच झाले आहेत. वाढत्या मोबाइलच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या संशयाच्या कारणावरूनही अनेक वाद निर्माण होत आहेत. अशा सर्व वेगवेगळ्या वादांच्या समस्या सोडविण्यात यश आले आहे.
वाद मिटविण्यात आनंद
अनेक वेळा सहजी पोलिस ठाण्यात न जाता घरच्या घरी किंवा बाहेरच वाद मध्यस्थीला घेऊन मिटविण्यात आले. त्यामुळे विनाकारण होणारा मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास कमी झाला. वाद मिटल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहायला मिळाला. गावातील वातावरण शांत राहावे आणि कोणताही वाद पुढे वाढू नये, यासाठी समजूतदारपणे संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.
संवादातून तोडगा काढण्यात मदत
सध्या प्रपंच वादाच्या अनेक घटना घडत आहेत. कौटुंबिक बिघडलेला समतोल, घरातील संभाषणाचा अभाव किंवा गैरसमज यामुळे वाद विकोपाला जाऊन संसार तुटण्याची भीती असते. अशा परिस्थितीत अनेकांना प्रपंच वादातून मुक्त करण्यात आले. कौटुंबिक व महिला वादांमध्ये गावातील महिला मंडळांच्या अध्यक्ष व महिला सदस्यांना सोबत घेऊन चर्चा करण्यात आली आणि वाद मिटविण्यात आले. महिलांच्या प्रश्नांमध्ये महिलांचाही सहभाग राहिल्यामुळे संवादातून तोडगा काढण्यास मदत झाली.
एकोपा टिकविण्याचे काम
गावाची वाढलेली लोकसंख्या पाहता गावात नवीन व्यक्ती आल्यास ती व्यक्ती गावातील नाही, हेही आपल्या कामावरून तत्परतेने कळते. ग्रामसुरक्षा दल आणि शांतता कमिटीच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात, गावातील विविध उत्सव, शिवजयंती आणि आंबेडकर जयंती यावेळी शांततेत काम केले जाते. अशा उपक्रमांमुळे गावातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यास मदत होते. तंटामुक्त समिती, ग्रामसुरक्षा दल, शांतता कमिटी, महिला मंडळे, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक सहभागातून सोमाटणे गावात शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा टिकविण्याचे काम सातत्याने केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.