वाघोलीतील काही व्यावसायिकांनी घेतला 'हा' धक्कादायक निर्णय...

restaurants.jpg
restaurants.jpg

वाघोली (पुणे) : रेस्टॉरंट कधी खुली होतील हे अद्याप ही सांगता येत नाही. भरमसाठ भाडे चुकलेले नाही. पुढे पहिल्यासारखा व्यवसाय सुरु होईल की नाही माहिती नाही. अशा परिस्थितीत वाघोलीतील काही रेस्टॉरंट चालकांनी कायमचे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय काही अन्य व्यावसायिकांनीही व्यवसाय बंद करून गावाकडची वाट धरली. वाघोलीत विदर्भ, मराठवाडा, नगर, जालना, जळगाव या भागातील अनेक नागरिक स्थायिक झाले आहेत. यातील अनेक जण नोकरीसाठी तर काहींनी अगदी घरगुती व्यवसायापासून अन्य व्यवसाय सुरू केले.

मुख्य महामार्गावर असल्याने शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर असल्याने टी सेंटर, भेळ, मिसळ हॉटेल, व्हेज रेस्टॉरंट चायनीज गाड्या, घरगुती मेस आदी व्यवसाय जोरात सुरू झाला होता. ग्राहकांचीही रेलचेल भरपूर वाढली होती. भरमसाठ भाडे असतानाही व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिसादामुळे व्यवसाय करीत होते. कोरोनाचे संकट आले. लॉकडाऊन सुरू झाले आणि व्यवसायाला घरघर लागली. पार्सल देण्याची परवानगी असली तरी अनेक हॉटेल चालकांनी व्यवसाय बंद ठेवले. ग्राहकांचा कितपत प्रतिसाद मिळेल, कोरोनाची भीती, कामगारांचा तुटवडा असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते.

जून अखेरीस काही हॉटेल चालकांनी पार्सल सुरू केले. मात्र ग्राहकांचा तेवढा प्रतिसाद नाही. या पुढे कितपत व्यवसाय होईल याची खात्री नाही, कामगारांचा प्रश्न, भरमसाठ भाडे या सर्व बाबींचा विचार करून अनेक रेस्टॉरंट चालकांनी कायमचा बंदच निर्णय घेतला. अद्यापही शासनाने रेस्टॉरंटला परवानगी दिलेली नाही. फक्त पार्सल सेवा सूरु आहे. त्यालाही प्रतिसाद कमी आहे. मात्र ही परिस्थिती निवळेलं व पूर्वी प्रमाणे व्यवसायाला गती येईल या आशेवर सध्या रेस्टॉरंट, छोटे हॉटेल चालक खर्चाची ओढाताण करून व्यवसाय करीत आहेत.

भाडे द्यावेच लागणार

वाघोलीत मुख्य रस्त्यावर 300 ते 400 चौ फूट गाळ्याला 25 ते 30 हजार रुपये भाडे आहे. गाळे मालकांनी भाडे देण्यास भाडेकरूंना सांगितले आहे. त्यामुळे काही व्यावसायिकांनी तीन महिन्यांचे भाडे मिटवून आपले व्यवसाय बंद केले. प्रामुख्याने हॉटेल चालकांची संख्या अधिक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असे ही मालक
लॉकडाऊनमुळे व्यवसायच बंद असल्याने नगर महामार्गालगत असलेल्या एका गाळे मालकाने दोन महिन्यांचे भाडे माफ केले. मात्र, व्यवसाय बंद करायचा नाही. व्यवसाय बंद केल्यास भाडे घेऊ अशी त्यांची अट होती. मात्र, तरीही त्यांच्या गळ्यातील दोन हॉटेल चालकांनी व्यवसाय बंद केलेच.

 मेस बंद
वाघोलीत शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर असल्याने हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे व्यावसायिक व घरगुती मेस व्यवसाय जोरात होता. मात्र, आता शैक्षणिक संस्थाच बंद असल्याने या मेस ही बंद झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काही कामगारांचे पार्सल डबे सुरू आहेत.

गावांचा लॉकडाऊनचा निर्णय...
सध्या गावात रुग्ण आढळला की ग्रामपंचायत कोणालाही विश्वासात न घेता 10 ते 15 दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेत आहेत. ग्रामीण भागात असे प्रकार सुरू आहेत. असा लॉकडाऊन जाहीर करताना जिल्हाधिकारी यांची परवानगी गरजेची आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. आता कुठे व्यवसायाची गाडी थोडी रुळावर येऊ लागली आहे. मात्र अशा निर्णयामुळे व्यापारी धास्तावत आहेत. वाघोलीत मात्र, सर्व बाबी लक्षात घेऊनच व सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रेस्टॉरंटला अद्याप परवानगी मिळालेली नाही. कधी मिळेल याची शाश्वती नाही. पुन्हा पहिल्यासारखा व्यवसाय होईल की नाही माहीत नाही. कामगारांचाही प्रश्न आहेच. भाडे व अन्य खर्च याचा ताळमेळ बसणार नाही यामुळे हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला.

- हॉटेल व्यावसायिक.
 

सध्या व्यवसाय खूप कमी झाला आहे. भाडे व अन्य खर्च परवडत नाही. कुटुंबाला इकडे आणणे शक्य नाही. बाहेरचे खाणे धोक्याचे वाटते. कुटुंब म्हणते सध्या इकडेच या. सगळं सुरळीत झालं की पुन्हा तिकडे व्यवसाय सुरू करू. त्यामुळे या महिना अखेरीस व्यवसाय बंद करून गावी जाणार आहे.  

-टेलरिंग व्यवसायिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com