esakal | ‘सोमेश्‍वर’साठी ८० टक्के मतदान; ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

someshwar cooperative sugar mill

‘सोमेश्‍वर’साठी ८० टक्के मतदान; ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मंगळवारी (ता. १२) कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यात शांततेत व तणावरहित मतदान झाले. काँटे की टक्कर नसताना आणि मयतांची संख्या मोठी असतानाही तब्बल ८० टक्के मतदान झाले. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, भाजप नेते दिलीप खैरे, पी. के. जगताप यांच्यासह ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. गुरुवारी (ता. १४) मतमोजणी होणार आहे.

मागील वीस वर्षातील ही सगळ्यात शांत निवडणूक ठरली. मध्यान्हीपर्यंत पन्नास टक्के तर सायंकाळी पाचपर्यंत कार्यक्षेत्रात ७७ टक्के मतदान झाले होते. अखेरीस २५ हजार ६७७ मतदारांपैकी ७९.९७ टक्के म्हणजेच २० हजार ५३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील दोन निवडणुकांत ‘काँटे की टक्कर’ असताना ८२ टक्के मतदान झाले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिष्ठेसाठी, तर भाजपने अस्तित्व दाखवून देण्यासाठी अधिकाधिक मतदान करण्याचा विडा उचलला होता.

आमदार संजय जगताप, पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, सतीश काकडे, प्रमोद काकडे, दिलीप खैरे या नेतेमंडळींनी सकाळीच मतदान करून विविध बूथवर भेटी दिल्या. निंबूत, अंदोरी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना दिलीप खैरे यांना किरकोळ तंबी द्यावी लागली. वाल्हे येथील मतदान केंद्र वाल्मीकी विद्यालयात होते, परंतु मतदार यादीवर जिल्हा परिषद शाळा दाखविल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. दीड वर्षापूर्वीची मतदार यादी असल्याने मयतांची नावे मोठ्या संख्येने होती. थोड्या प्रमाणात भावकी-गावकी बघून क्रॉस वोटींग झाले असल्याचीही कार्यक्षेत्रात चर्चा आहे. जवळार्जुन, जळगाव, नाझरे, शिरष्णे असे काही बूथ मतदान करण्यात मात्र कमी पडले.

प्रमुख केंद्रनिहाय मतदानची टक्केवारी वाघळवाडी - ९०, चौधरवाडी- ९०, वाल्हे- ९०, खंडोबाचीवाडी- ८८ टक्के, करंजेपूल- ८७.५०, चोपडज- ८७, जेऊर - ८६, गडदरवाडी- ८६, वाकी- ८६, करंजे- ८५.६३, गुळुंचे- ८४.९६, वाणेवाडी व मगरवाडी- ८३, लाटे- ८५, कोऱ्हाळे बुद्रुक - ८३.७५, थोपटेवाडी- ८३.७५, कोऱ्हाळे खुर्द ८२, सुपे- ७९, मुरूम- ८२.३४, देऊळगाव रसाळ- ८३.१५, मांडकी- ८०, पाडेगाव- ८५, होळ- ८०, सदोबाचीवाडी- ७९.

loading image
go to top