विस्तारवाढीतील प्रकल्पांमुळे ‘सोमेश्‍वर’चे उत्पन्न वाढणार

विस्तारवाढीतील प्रकल्पांमुळे 
‘सोमेश्‍वर’चे उत्पन्न वाढणार
Published on: 

वडगाव निंबाळकर, ता. २६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांत अनेक चढ-उतार पार करत कारखान्याची आर्थिक घडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सुमारे २९० कोटी रुपयांची कर्जफेड केली असून, विस्तारवाढीतील प्रकल्पांमुळे कारखान्याच्या उत्पन्नात आणखी वाढ होईल, असा विश्वास माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला. कारखान्याचा पदभार सोडताना त्यांनी पत्रकार परिषदेत कार्यकाळाचा आढावा घेतला.
गेल्या पाच वर्षांत कारखान्याच्या विस्तारवाढीसाठी ७३ कोटी, सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी ११५ कोटी आणि डिस्टिलरी प्रकल्पासाठी १८५ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. तिन्ही प्रकल्पांसाठी एकूण ३७३ कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. वाढीव क्षमतेच्या प्रकल्पांतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कर्जफेड शक्य होईल. डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे जगताप यांनी सांगितले.
पावसाचा अभाव आणि हुमणी किडीमुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असून, यंदा सुमारे १२ लाख टन गाळपाचा अंदाज आहे. चालू हंगामात पहिला हप्ता प्रतिटन ३,८०० रुपये द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. साखरेला चांगला दर आणि अपेक्षित गाळप झाल्यास प्रतिटन ४,५०० रुपयांपर्यंत ऊसदर देणे शक्य असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ करण्याच्या राजू शेट्टी यांच्या मागणीला जगताप यांनी पाठिंबा दिला. यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकत्रितपणे दोन दिवस गाळप बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सभासदांचे हित आणि कारखान्याचा नावलौकिक कायम राखण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com