

वडगाव निंबाळकर, ता. ११ : राज्यात सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून परिचित असलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. ११) टक्के मतदान झाले.
कारखान्याच्या सत्तेसाठी तिन्ही पॅनेलनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीत ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी (ता. १२) होणाऱ्या मतमोजणीकडे सभासदांसह राज्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दिवसभर अनेक मतदान केंद्रांवर सभासदांची गर्दी पाहायला मिळाली. काही केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान करण्याची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याने मतदारांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. मतदानासाठी लागणारा वेळ पाहता निर्धारित वेळेत प्रक्रिया पूर्ण होईल का, अशी चर्चा मतदान केंद्रांच्या परिसरात सुरू होती. सायंकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली. मात्र, त्या वेळी मतदान केंद्रांवर उपस्थित असलेल्या सभासदांना मतदानाची संधी देण्यासाठी त्यानंतरही प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. मतपत्रिकेवर मतदान करताना प्रत्येक उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारण्यासाठी वेळ लागत असल्याने काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली. असे असले तरी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या सभासदांना मतदानासाठी गावात आणण्यावरही उमेदवारांनी भर दिला. कारखान्याचा कारभार, ऊसदर, सभासदांचे हित आणि आगामी काळातील आव्हाने या मुद्द्यांभोवती निवडणुकीची चर्चा रंगली होती. तिन्ही पॅनेलनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मतदानाच्या कौलाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तिन्ही पॅनेलची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत तीन पॅनेलचे एकूण ८३ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे प्रत्येक गटातील लढतीकडे सभासदांचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पॅनेलप्रमुख, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशीही मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.
निकालाकडे सर्वांचे लक्ष
सोमवारी होणाऱ्या मतमोजणीतून कारखान्याच्या सत्तेचा फैसला होणार आहे. सभासदांनी कोणत्या पॅनेलच्या बाजूने कौल दिला, हे निकालानंतर स्पष्ट होईल. या निकालाचे पडसाद बारामती तालुक्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात उमटणार असल्याने सभासद, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.