

वडगाव निंबाळकर, ता. ५ : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तीनही पॅनेलनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आता घरोघरी जाऊन सभासदांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. कारखान्याचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि मोठी सभासद संख्या पाहता उमेदवारांसमोर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत तब्बल २७ हजार ७०० सभासद मतदानाचा हक्क बजावणार असून ८३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी २१ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पॅनेलच्या उमेदवारांसह अपक्षांनीही वैयक्तिक संपर्कावर भर दिला आहे. सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यांतील सुमारे १५० गावांमध्ये पसरले आहे. गावागावांतील वाड्या-वस्त्यांवर सभासदांच्या भेटी घेण्यासाठी उमेदवारांना मोठा प्रवास करावा लागत आहे. कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीसह स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सभासदांच्या अपेक्षा यावर चर्चा करत मतदारांना आपापली भूमिका पटवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे प्रचार करणाऱ्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. सकाळच्या सत्राबरोबरच सायंकाळीही भेटीगाठींना प्राधान्य दिले जात आहे. उन्हाची तीव्रता असतानाही कार्यकर्त्यांसह उमेदवार गावोगावी फिरत असून प्रचाराचा उत्साह कायम आहे. निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येईल, तसतसा प्रचाराचा जोर वाढेल. मोठ्या कार्यक्षेत्रात अधिक सभासद आणि रिंगणातील उमेदवारांची संख्या यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
प्रथमच प्रचाराच्या मैदानात
सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील तरुण पिढी प्रथमच प्रचाराच्या मैदानात सक्रियपणे दिसत आहे. पवार कुटुंबातील तरुण नेतृत्वाची सभासदांशी संवाद साधण्याची शैली, मांडणी आणि प्रचारातील आक्रमकता पाहण्यासाठी गावोगावी होणाऱ्या सभांना गर्दी होत आहे. अजितदादांनंतर पवार कुटुंबातील पुढील पिढीतील नेतृत्वाची झलक या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना जवळून पाहता येत आहे. त्यामुळे सभासदांमध्येही ‘तरुण पिढीचा प्रचार आणि नेतृत्वाची शैली कशी असेल?’ याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.