

वडगाव निंबाळकर, ता. १९ : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला पहिली उचल प्रतिटन ४००० रुपये करावी आणि गळितास येणाऱ्या उसाचा खोडवा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांस भक्कम अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कारखान्याची माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना दिले.
सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. एक पंधरवडा आम्ही शेतकरी पेमेंट उशिरा घेऊ, परंतु एकरकमी चार हजार रुपये उचल द्यावी. अगदी छोटे कारखाने, शेजारचे कारखाने ३९०० रुपये प्रतिटन दर देत असताना सोमेश्वर कारखान्याने स्वतःला शोभेल असा दर द्यावा. सभासदांचा ऊस बाहेर जाऊ नये, यासाठी हा दर आवश्यक आहे, असे आवाहन पुरुषोत्तम जगताप यांनी केली.
जगताप म्हणाले, ‘‘सोमेश्वर कारखान्याने डिसेंबरपासूनच तुटणाऱ्या उसाला अनुदान देणे सुरू करावे. तसेच, आगामी हंगामात केवळ १६ हजार एकर ऊस उपलब्ध आहे, तो वाढवण्यासाठी चालू हंगामात गळीत होणाऱ्या उसाचा खोडवा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून भक्कम अनुदान दिले तरच आगामी हंगामासाठी ऊस उपलब्ध होईल. मूळच्या चार मिलमध्ये गतवर्षी पाचवी मिल टाकल्याने दररोज दहा हजार टन प्रतिदिन गाळप होत असून, साखर उतारा अत्यंत चांगला मिळत आहे. परंतु, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सभासदांचा ऊस लवकरात लवकर गाळप करावा आणि कार्यक्षेत्र बाहेरून आणला जाणारा गेटकेन गाळप करणे थांबवावा. ४००० दर न दिल्यास आंदोलनाचा विचार करावा लागेल.’’
याप्रसंगी कारखान्याचे माजी संचालक महेश काकडे, महेश राणे, अविनाश जगताप, श्यामराव धुमाळ, संभाजी घाडगे, विश्वास जगताप, मिलिंद कांबळे, गोरख खोमणे, संतोष दरेकर आदी उपस्थित होते.
राजेंद्र यादव यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा देत संचालक मंडळाच्या बैठकीत उद्या योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तर, शेती अधिकारी बापूराव गायकवाड यांनी ऊस तोडणी नियोजनाची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.