सोमेश्वरनगर - उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत 'सोमेश्वर'च्या संचालक मंडळाने आज केंद्रसरकारच्या सूत्रानुसार एकरकमी एफआरपी त्वरीत अदा करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमेश्वरची एकूण एफआरपी ३१७० रूपये प्रतिटन इतकी जिल्ह्यात उच्चांकी निघाली आहे. एफआरपीची उर्वरीत ३७३ रूपये प्रतिटनाप्रमाणे होणारी ४५ कोटींची थकबाकी मार्चअखेरीस सभासदांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.
केंद्रसरकारच्या एफआरपी कायद्यानुसार एकरकमी एफआरपी अदा करणे बंधनकारक आहे. मात्र राज्यसरकारने दोन टप्पे करण्याचा बेकायदेशीर आदेश काढला होता. आता तो उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मात्र अद्याप साखरआयुक्तालय अथवा साखरसंघाकडून कारखान्यांना अधिकृत आदेश आलेला नसल्याने अनेक कारखान्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने आज उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत केंद्रसरकारचा कायदा अंतिम मानत एकरकमी ३१७३ रूपये एफआऱपी देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला. आतापर्यंत २८०० रूपये प्रतिटन इतकी पहिली उचल दिली आहे. उर्वरीत ३७३ रूपये मार्चअखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.
या निर्णयानुसार १५ नोव्हेंबर ते १५ मार्चपर्यंत गळीत झालेल्या उसापोटी ४५ कोटी रूपये अधिकचे मिळणार आहेत. याशिवाय सोसायट्यांचे कर्ज भरता यावे यासाठी १५ मार्च ते २५ मार्चपर्यंत गळीत झालेल्या उसापोटी सोसायट्यांना आवश्यक तेवढ्या रकमा पाठविल्या जाणार आहेत. तर उर्वरीत रकमा १० एप्रिलला सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्या जाणार आहेत.
सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, राज्यसरकारच्या आदेशानुसार चालू हंगामाचा उतारा (१२.०५ टक्के) व तोडणी वाहतूक खर्च गृहित धरून ३११० ते ३१२५ रूपयांच्या आसपास एकूण एफआरपी होत आहे.
तर केंद्रसरकारच्या आदेशानुसार गतहंगामाचा उतारा (१२.२१ टक्के) व तोडणी वाहतूक खर्च (८७८ रू. प्रतिटन) गृहित धरून ३१७३ रूपये एकूण एफआरपी होत आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत ३१७३ रूपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. यामुळे कर्जफेड, शेतभांडवल, शिक्षण यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
सत्याचाच विजय होईल
काकडे महाविद्यालयाबाबतचा निकाल अंतिम टप्प्यात असून यावरून कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत पुरूषोत्तम जगताप म्हणाले, काकडे महाविद्यालय 'सोमेश्वर'च्या सभासदांचे असून ते परत मिळावे यासाठी तीस वर्ष उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. हा सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
सभासदांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा. आमचा न्यायव्यवस्थेवरही पूर्ण विश्वास असून सत्याचाच विजय होईल. तसेच टाईम ऑफीसव्दारे झालेल्या अपहाराची व्दिस्तरीय चौकशी चार दिवसात पूर्ण होईल आणि त्यातील दोषींवर कडक कारवाई होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.