नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

फिर्यादी पुरणचंद आहेर हे त्यांच्या कुटुंबीयांसह खडकीतील गवळीवाडा परिसरात राहातात. मागील काही महिन्यांपासून त्यांचा व मुलगा कपिल याच्याशी संपत्तीवरुन वाद सुरू होता.

पुणे : संपत्तीवरुन कुटुंबामध्ये कलह होण्याच्या घटना नवीन नाहीत. त्यावरुन अनेकदा कुटुंबातील सदस्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. याच पद्धतीने खडकीमध्ये तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या लेकाने संपत्तीच्या वादातून आपल्या जन्मदात्या वडीलांवर चाकू हल्ला केला. तर सुनेनेही सासूला लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. या घटनेत वृद्ध दाम्पत्या जखमी झाले असून मुलगा व सुनेविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुरणचंद आहेर (वय 68, रा. गवळीवाडा, खडकी) असे जखमी झालेल्या वृद्ध नागरीकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा कपिल आहेर (वय 36 ) व सून निशा (वय 30) यांच्याविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुरणचंद आहेर, यांनीच फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुरणचंद आहेर हे त्यांच्या कुटुंबीयांसह खडकीतील गवळीवाडा परिसरात राहातात. मागील काही महिन्यांपासून त्यांचा व मुलगा कपिल याच्याशी संपत्तीवरुन वाद सुरू होता. गवळीवाड्यातील जुनी तालीम परिसरात आहेर यांचे घर असून घराशेजारीच कडबा कापणी यंत्र ठेवण्यात आले आहे. कडबाकुट्टीच्या जागेवर पूरणचंद यांना गोठा करायचा होता. त्यामुळे पुरणचंद यांनी तेथील कडबा कापणी यंत्र काढून टाकण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये अर्ज दिला होता. त्यामुळे फिर्यादींवर त्यांचा मुलगा कपिल चिडला होता.

शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कपिलने वडिलांना याप्रकरणाचा जाब विचारला. कडबा कापणी यंत्र काढण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डात अर्ज का केली, अशी विचारणा करीत त्याने वडीलांशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने त्याच्याकडील चाकूने वडीलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी पूरणचंद यांनी त्यास प्रतिकार केला. दोघांची झटापट सुरू होती, त्यावेळी कपिलकडील चाकूने पूरणचंद यांच्या हातावर व बोटावर वार केले. त्यामध्ये ते जखमी झाले. दरम्यान, भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिर्यादीच्या पत्नीला त्यांच्या सुनेने सासूला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या मनगटाचे हाड तुटले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी तांबे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Son and his wife Attacked on old Mother and father in pune