पुणे : बळीराजाची पोरं म्हणाली, 'प्रेम द्या, प्रेम घ्या...'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

- निमित्त 'व्हॅलेंटाईन डे'चे

पुणे : फेटे घातलेले तरुण...बँड बाजावर वाजणारी देशभक्तीसह चित्रपटातील गाणी...अन् रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना गुलाब पुष्पाचे होणारे वाटप...ही काही शोभा यात्रा नव्हती. तर बळीराजाच्या मुलांनी एकत्र येऊन शहरी व ग्रामीण लोकांचे संबंध आणखी दृढ व्हावेत, यासाठी काढलेली 'प्रेम यात्रा' होती. निमित्त होते "व्हॅलेंटाईन डे'चे. यास विद्यार्थी, विद्यार्थिनींसह नागरिकांनी प्रतिसाद देत यात सहभाग घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक ते कृषी महाविद्यालय अशी ही प्रेम यात्रा काढली.
पुण्यात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, शहरी भागातील लोकांशी त्यांचा संवाद घडावा, एकमेकांबद्दल प्रेम वाढीस लागावे. तसेच शेतकऱ्यांच्या गुलाबाची विक्री व्हावी या हेतूने प्रथमच अशी यात्रा आयोजित केली.

प्रेमाचा संदेश देणाऱ्या यात्रेत "प्रेम यात्रा' लिहिलेला फलक सर्वात पुढे होता. तसेच विद्यार्थी विद्यार्थीनींनी "प्रेम कोणावरही करावे...', "प्यार बॉंटते चलो...' असे फलक घेऊन "प्रेम द्या प्रेम घ्या' अशा घोषणा देण्यात आल्या. पादचारी मार्गावरून चालणारे नागरिक, दुकानदार, वाहनचालक यांना उत्साहाने गुलाबाचे फुल देऊन त्यांना प्रेम दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा अनोखा उपक्रम राबविला जात असल्याने नागरिकांनीही त्यास भरभरून पाठिंबा देत याचे स्वागत केले.

आयोजक राहुल म्हस्के म्हणाले, "आजचा दिवस जगभरात प्रेम दिवस म्हणून साजरा होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेमभावना निर्माण व्हावी. व्हॉट्‌सऍपवरून गुलाबाची फुले न पाठवता, प्रत्यक्ष भेटून आपल्या प्रियजनांना फुले द्यावीत. यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठ मिळेल असा या यात्रेचा उद्देश आहे.

सचिन पाटोळे म्हणाला, "व्हॅलेंटाईन डे' हा प्रेम देणे आणि घेण्याचा आहे. यात कसलाही मतभेद केला जाऊ नये. साने गुरूजी यांनी "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हाच संदेश आम्ही देत आहोत. ही यात्रा शेतकऱ्यांच्या मुलांनी ही यात्रा काढली आहे, याचे वैशिष्ट्य आहे.''

सोनाली पालखे ही विद्यार्थीनी म्हणाली, "व्हॅलेंटाईन डे'ला ही यात्रा काढण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे समाजामध्ये चांगला संदेश जात असून, सर्वाजण उत्साहाने सहभागी झाल्याने आम्हालाही मजा येत आहे.

प्रेमी युगुलांचाही आनंद द्विगुणित

फर्ग्युसन रस्त्यावर ही यात्रा जास असताना पादचारी मार्गावरून जाणाऱ्या प्रेम युगलांनाही कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनाही अनपेक्षित शुभेच्छा मिळाल्याने सुखद धक्का बसला. अनेक तरुणीही या "प्रेम यात्रे'चे क्षण मोबाईलमध्ये टिपण्यास सरसावल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son of Farmers says Give Love Get Love in occasion of Valentine Day