
पिंपळवंडी (पुणे) : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जुन्नर तालुक्यात विशिष्ठ प्रकारचे दगड आढळतात. या दगडांचे वैशिष्ठ्य म्हणजे, या दगडांवर दुसऱ्या दगडाने किंवा लोखंडाने मारले तर टन टन असा घंटेसारखा आवाज येतो. निसर्गाचा हा चमत्कारच समजला जात आहे.
जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला असून, जुन्नर तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेला आहे. अनेक गड किल्ले, लेणी, घाटवाटा, नैसर्गिक पूल, नयनरम्य ठिकाणे या ठिकाणी आहेत. सह्याद्रीचा खडक हा अग्निजन्य असून, तो मजबूत व टणक आहे. परंतु, हाच खडक जर घंटेसारखा वाजत असेल, तर ते एक आश्चर्यच समजले जाईल. असे घंटेसारखे वाजणारे दगड जुन्नर तालुक्यातील आंबे हातवीज या गावाजवळील पठार, दुर्गादेवी टेकडी व हरिशचंद्र गडावर आपल्याला पाहायला मिळतात. जुन्नर तालुक्यातील हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात.
या दगडांचे वैशिष्टय म्हणजे हे दगड दिसायला सामान्य दगडासारखेच असतात, परंतु या दगडावर आपण दुसऱ्या दगडाने किंवा लोखंडाने मारले असता प्रत्यक्षात त्यातून टन टन असा घंटेसारखा आवाज येतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे घंटेसारखे वाजणारे दगड आढळून येतात. पूर्वी अज्ञानापायी काही लोक या दगडात दैवी चमत्कार असल्याचे सांगत, परंतु या दगडांत लोह व इतर खनिजाचे प्रमाण जास्त असल्याने त्यातून घंटेसारखा आवाज येत असतो, असे तज्ञांचे मत आहे.
आंबे गावाजवळ २०० मीटर अंतरावर दोन दगड हे पठारावर असल्याने तेथे जाणे सहज शक्य होते. त्यामुळे पर्यटक या अपरिचित ठिकाणाला भेट देऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे हरिशचंद्र गडावरील कोकणकड्याजवळ व दुर्गवाडी येथील दुर्गादेवी टेकडीवर असे वाजणारे ७ दगड आपल्याला पाहायला मिळतात. जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी कधी आपण आलात, तर या ठिकाणी नक्की भेट द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.