

सोर्स कोड चोरीचा दुबईला पळालेला मास्टरमाईंड गजाआड
भारतात परतताच विमानतळावरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर, ता. ८ ः पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा गोपनीय सोर्स कोड चोरी करून बाहेर पाठवल्याच्या गंभीर प्रकरणात अहिल्यानगर सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर थेट दुबईला पलायन केलेल्या संशयित आरोपीला अखेर पुणे विमानतळावरच बेड्या ठोकण्यात आल्या. मंदार प्रदीप पाथरीकर (वय ३३, रा. नवीपेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पाथरीकर याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दुबईहून तो पुणे विमानतळावर दाखल होताच अहिल्यानगर सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. सोमवारी (ता. ७) त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी नितीन गोपालदास भराडिया (वय ४२, रा. पुणे) यांनी मार्च २०२६ मध्ये अहिल्यानगर सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या होत्या. त्यावरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका गुन्ह्यात पाथरीकर याला अटक करण्यात आली आहे.
भराडिया हे पीआरएम सॉफ्ट सोल्युशन प्रा. लि. कंपनीत प्रमुख धोरण अधिकारी (सीएसओ) म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी शासनाच्या विविध विभागांसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम करते. ग्रामविकास विभागासाठी कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने २०२४ मध्ये एकात्मिक एकल पोर्टल (एसयूपी) ही महत्त्वाची संगणकीय प्रणाली विकसित केली होती. ही प्रणाली १ एप्रिल २०२५ पासून अधिकृतपणे कार्यान्वित झाली होती. मात्र, कंपनीचे कामाचे देयक प्रलंबित राहणे आणि बँकेकडून करार पूर्ण करण्यात झालेल्या विलंबामुळे कंपनीने एप्रिल २०२५ मध्ये एसयूपी प्रणालीची सेवा बंद केली. त्यानंतर बँकेकडून या प्रणालीचा सोर्स कोड मागण्यात आला. मात्र, त्यासाठी कोणताही औपचारिक करार नसल्याचे सांगत कंपनीने सोर्स कोड देण्यास नकार दिला. ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान बँकेकडून सादर करण्यात आलेली प्रणाली ही कंपनीने विकसित केलेल्या एसयूपी प्रणालीशी साधर्म्य असलेली असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांंनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता.
---
सहा जणांविरुद्ध गुन्हा
या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. काही माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीचा गोपनीय डेटा अनधिकृतपणे क्लाउड प्लॅटफॉर्म, ई-मेल आणि बाह्य हार्डडिस्कच्या माध्यमातून हस्तांतरित केल्याचे तपासात आढळले. इतकेच नव्हे, तर विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून सॉफ्टवेअरचा सोर्स कोड कंपनीबाहेर पाठविण्यात आल्याचेही समोर आले. त्यानंतर अहिल्यानगर सायबर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मंदार पाथरीकर याच्यासह शैला केदार (नवीपेठ, पुणे), मुकुंद दायमा (हिंजेवाडी, पुणे), जालिंदर गमे (काळेवाडी रहाटे, अहिल्यानगर), योगेश चव्हाण (पिंपरी-चिंचवड) व चैतन्य दिलीप जोशी (सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
---
मंदार पाथरीकरच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला वेग येणार आहे. सोर्स कोड नेमका कोणाच्या माध्यमातून बाहेर गेला? चोरी केलेल्या डेटाचा वापर कुठे आणि कशासाठी झाला? हा डेटा अथवा कोड अन्य कोणाला देण्यात आला का? तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सायबर पोलिस करत आहेत.
- सागर ढिकले, निरीक्षक, सायबर पोलिस, अहिल्यानगर
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.