दक्षिण आशियाई देशांत यंदा दमदार मॉन्सून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

पुणे - दक्षिण आशियाई देशांमधील बहुतांश भागात यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) दमदार बरसतील, असा अंदाज "साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम'तर्फे (सॅस्कॉफ) भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी शुक्रवारी वर्तविला.

पुणे - दक्षिण आशियाई देशांमधील बहुतांश भागात यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) दमदार बरसतील, असा अंदाज "साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम'तर्फे (सॅस्कॉफ) भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी शुक्रवारी वर्तविला.

"सॅस्कॉफ'च्या दोनदिवसीय परिषदेचा समारोप शुक्रवारी पुण्यात झाला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना डॉ. रमेश यांनी ही माहिती दिली. या परिषदेत बांगलादेश, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि मालदीव येथील हवामान तज्ज्ञ सहभागी झाले होते. यात दक्षिण आशियाई देशांमध्ये या वर्षी मॉन्सूनचा पाऊस समाधानकारक पडेल, असे डॉ. रमेश यांनी सांगितले. त्यासाठी राष्ट्रीय आणि विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्‍लेषण करून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रशांत महासागरातील थंड पाण्याच्या प्रवाहाची (ला नीना) स्थिती बदलत आहे. याचे रूपांतर उष्ण पाण्याच्या प्रवाहात (एल निनो) लवकरच सुरवात होण्याची शक्‍यता जगातील हवामान संस्थांकडून वर्तविण्यात येत आहे; पण त्यापूर्वी मॉन्सूनच्या पहिल्या टप्प्यात ही "एल निनो'ची स्थिती सामान्य राहील, यावर हवामान तज्ज्ञांचे एकमत आहे, असेही डॉ. रमेश यांनी स्पष्ट केले.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा फरक म्हणजे "इंडियन ओशन डायपोल' (आयओडी) सर्वसाधारण स्थितीत आहे, तर मॉन्सूनच्या मध्यावरही स्थितीत बदल होण्याची शक्‍यता आहे. उत्तर गोलार्धातील डिसेंबर, फेब्रुवारी महिन्यात बर्फाचे प्रमाण सर्वसाधारण होते, तर मार्च महिन्यापासून सरासरीपेक्षा अधिक होते. उत्तर गोलार्धातील हिवाळा व उन्हाळ्यातील बर्फाचे प्रमाण व आशियातील मॉन्सून यांच्यात परस्परविरोधी संबंध असतो. इंडियन ओशन डायपोल, उष्णकटिबंधीय अटलांटिक समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, युरेशियन जमिनीचे तापमान आदी प्रादेशिक आणि जागतिक घटकांचा मॉन्सून क्षेत्रातील पावसावर परिणाम होऊ शकतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

दक्षिण आशियातील मॉन्सूनचा अंदाज (जून ते सप्टेंबर)
भारत, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार - सरासरी गाठणार
बांगलादेश - ईशान्य बांगलादेशातील भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस. उर्वरित भागात सरासरी गाठणार
श्रीलंका - 70 टक्के भागात सरासरी पाऊस
मालदीव - 50 टक्के भागात सरासरी पाऊस

अर्ध्या ईशान्य भारतावर पाऊस रुसणार
ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मणिपूरचा काही भाग येथे सरसारीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. राजस्थान आणि गुजरातच्या पश्‍चिम भागात पाऊस रुसेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात सरासरी गाठणार
महाराष्ट्रात सरासरीइतक्‍या पावसाची शक्‍यता व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात सरासरीइतक्‍या पावसाची शक्‍यता 50 ते 60 टक्के, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 40 ते 50 टक्के आहे. कोकण, गोव्यासह कर्नाटक किनारपट्टी, विदर्भ, छत्तीसगड, झारखंडमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्‍यता अधिक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south asia monsoon rain