Pune News : परदेशालाही खुणावतेय पुण्याचे वैद्यकीय क्षेत्र

साखळी रुग्णालयांची संख्या वाढू लागली ; दक्षिण भारतातील वैद्यकीय क्षेत्राची पुण्याकडे धाव
South India medical sector rushes to Medical field of Pune
South India medical sector rushes to Medical field of Pune esakal

पुणे : शहरातील वैद्यकीय क्षेत्रांत साखळी रुग्णालयांची संख्या वाढू लागली आहे. त्यासाठी दक्षिण भारतातील व्यावसायिक गुंतवणूक करण्यास पुण्याला पसंती देत आहेत. त्यामध्ये परदेशी गुंतवणुकीचाही समावेश आहे. तीन मोठी सुसज्ज रुग्णालये शहराच्या उंबरठ्यावर पोचली असून त्यासाठी त्यांनी किमान ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यामुळे पुणेकरांना ५०० हून बेडस उपलब्ध होणार आहेत.

वैद्यकीय सेवेच्या विस्ताराची गरज कोरोनाच्या काळात अधोरेखित झाली आहे. तसेच रुग्णालय व्यवस्थापन, हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परदेशातूनही देशातील वैद्यकीय क्षेत्रात गुंतवणूक वाढली आहे.

दक्षिण भारतातून आताही गुंतवणूक पुण्यापर्यंत पोचत आहे. दळणवळणाच्या सुविधा, क्रयशक्ती असलेली लोकसंख्या, हवामान आणि उपचारांसाठी इतर जिल्ह्यांतून पुण्यात मोठ्या संख्येने येत असलेले नागरिक, आदी मुद्दे गुंतवणूकदारांना खुणावत आहेत. शहरातील एका प्रमुख रुग्णालयाचे बहुतांश शेअर्स एका परदेशातील कंपनीने नुकतेच घेतले आहेत.

बंगळुरूमधील मणिपाल समूहाने बाणेरमध्ये २५० बेडसचे सुसज्ज मणिपाल हॉस्पिटल नुकतेच सुरू केले आहे. त्यांचे देशातील हे देशातील २८ वे रुग्णालय आहे. त्यासाठी त्यांनी सुमारे ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या ग्रूपने पाच वर्षांपूर्वी खराडीमध्ये १०० बेडसचे रुग्णालय सुरू केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे आता त्यांनी मोठे पाऊल टाकले आहे.

स्विर्त्झलंडमधील गुंतवणूक असलेल्या हैदराबादमधील ‘मेडीकव्हर’ने १२ देशांत रुग्णालये उभारली आहे. देशातील प्रमुख शहरांत १८ रुग्णालये उभारली असून १९ वे सुसज्ज रुग्णालय त्यांनी पुण्याजवळ भोसरीमध्ये उभारले आहे. सुमारे ३०० बेडसच्या या रुग्णालयाचे पुढील महिन्यात उदघाटन होत आहे. त्यासाठी त्यांनी २०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. पिंपरी चिंचवडसह राजगुरुनगर ते आळेफाट्यापर्यंतचे हे सुसज्ज रुग्णालय असेल, असा ‘मेडिकव्हर’चा दावा आहे.

अमेरिकेतील गुंतवणूक असलेल्या हैदराबादमधील अंकुरा हॉस्पिटलनेही बाणेरमध्ये म्हाळुंगे रस्त्यावर सुसज्ज रुग्णालय उभारले असून त्याचेही पुढील महिन्यात उदघाटन होत आहे. ११० बेडसची क्षमता असलेले हे रुग्णालय महिला आणि लहान मुलांच्या उपचारांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. त्यासाठी त्यांनी ३५ कोटी रुपयांनीहून अधिक गुंवतणूक केली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे (माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र) ः रुग्णालय क्षेत्राचा समावेश केंद्र सरकारने या पूर्वीच ‘कॉर्पोरेट सेक्टर’मध्ये केला आहे. त्यामुळे साखळी रुग्णालयांची संख्या देशातील सर्वच प्रमुख शहरांत वाढत आहे. पुण्यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची (आयटी), उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांची संख्या मोठी आहे. तसेच या शहराची क्रयशक्ती चांगली आहे. त्यामुळे साखळी रुग्णालये पुण्यात वाढू लागली आहेत. त्यांच्यामुळे आधुनिक उपचारपद्धतीही येथे पोचत आहे. त्यांचे दर परवडतील का, यावर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते.

के. श्रीलक्ष्मी (उपाध्यक्ष, मेडीकव्हर) ः आमची कंपनी देशातील प्रमुख शहरांत आता पोचत आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या, येथील पायाभूत सुविधा, तसेच दळणवळण पाहता, पुण्याला आम्ही पसंती दिली. येथे सर्वच प्रकारचा वर्ग आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आम्ही पुण्यात आलो आहोत.

पुण्यातील रुग्णालये

- १०० पेक्षा अधिक बेडस असलेल्या रुग्णालयांची संख्या - ३०

- १०० पेक्षा कमी बेडस असलेल्या रुग्णालयांची संख्या - सुमारे ८००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com