esakal | सायबर क्राइम नियंत्रणासाठी पुणे पोलिसांची खास हेल्पलाईन
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

सायबर क्राइम नियंत्रणासाठी पुणे पोलिसांची खास हेल्पलाईन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Criminal) नागरीकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक (Cheating) केली जात आहे. अशा वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Police) नागरीकांमध्ये जनजागृती (Awareness) करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच सायबर गुन्हा घडल्यानंतर नागरीकांना त्वरीत मदत मिळावी, यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. (Special Helpline of Pune Police to Control Rising Cyber Crimes)

सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन माध्यमांचा वापर करून खरेदी तसेच अन्य व्यवहारात तक्रारदारांची गोपनीय माहिती घेऊन नागरीकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अशा परिस्थितीत अनेक नागरिकांना तक्रार कोठे आणि कशी करायची, याची माहिती देखील नसते. त्यामध्ये नागरीकांचे आर्थिक नुकसान होण्याचीही दाट शक्‍यता असते. त्यामुळेच सायबर पोलिसांनी हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. नागरीकांची ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रारदारांनी त्याबाबत त्वरीत (गोल्डन अवर्स) सायबर पोलिसांना माहिती देणे गरजेचे असते. नागरीकांनी सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रार केल्यास त्वरीत चोरट्यांच्या खात्यात वळविण्यात आलेली रक्कम किंवा व्यवहार थांबविण्यासाठी पोलिसांकडून संबंधित बॅंकेकडे पाठपुरावा केला जाऊ शकतो, त्यासाठीच हेल्पलाईन सुरू केली आहे, असे आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.

हेही वाचा: कोरोना मृत्यूमध्ये ‘साठी’च्या वरचे सर्वाधिक

सायबर गुन्हेगाराकडून नागरीकांच्या फसवणुकीचा गुन्हा घडल्यास नागरीकांनी त्वरीत त्याचे स्क्रीनशॉट, मेसेज, बॅंकेचे नाव, खाते क्रमांक, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड क्रमांक, लिंक मोबाइल क्रमांक याबाबतची माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉटसऍप क्रमांकावर पाठविल्यास किंवा स्क्रीनशॉट पाठविल्यास, ज्या खात्यातून पैसे काढण्यात आले आहेत. त्या बॅंकेशी पोलिसांकडून संपर्क साधण्यात येतो. तसेच सायबर गुन्हेगाराने ज्या बॅंकेच्या खात्यात पैसे वळवले असतील, त्या बॅंकेच्या आधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली जाते. त्यामुळे फसवणुकीच्या गुन्ह्यांना वेळीच आळा घालणे शक्‍य होते, असे त्यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी

- नागरिकांनी मोबाइल क्‍लोन ऍप डाऊनलोड करू नये

- अनधिकृत लिंक उघडू नयेत

- मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती इतरांना देऊ नये

- ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क करावा.

हेल्पाईन क्रमांक - 7058719371/7058719375

सायबर पोलिस ठाणे - 020 - 29710097

ई-मेल - crimecyber.pune@nic.in

loading image