यूपीएससीत मराठी टक्का वाढविण्यासाठी पुणे विद्यापीठात विशेष प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतील मराठी टक्का वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत या वर्षीपासून तीन वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची कमी वयात तयारी व्हावी आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी केंद्र सरकारच्या उच्च पदांवर पोचावेत, या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतील मराठी टक्का वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत या वर्षीपासून तीन वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची कमी वयात तयारी व्हावी आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी केंद्र सरकारच्या उच्च पदांवर पोचावेत, या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. 

या वेळी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक जयंत उमराणीकर उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना उमराणीकर म्हणाले, ""हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असेल. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी त्यासाठी प्रवेश घेऊ शकतील. विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षांना बसण्यास पात्र होईपर्यंत त्यांची या परीक्षेची तयारी पूर्ण झालेली असावी या अनुषंगाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. पदवीचे शिक्षण घेत असतानाच दररोज सायंकाळी दोन-अडीच तासांचे हे प्रशिक्षण असेल.'' 

तज्ज्ञांच्या व्याख्यानांबरोबर परीक्षांसाठी आवश्‍यक उत्तरे लिहिण्याचे कौशल्य, निबंध लेखन, इंग्रजीची उत्तम जाण, मुलाखतीचे तंत्र, तज्ज्ञ व यशस्वी व्यक्तींशी संवाद, तसेच अधिकारी बनण्यासाठी आणि नंतर अधिकारी म्हणून वावरताना आवश्‍यक असलेला व्यक्तिमत्त्व विकास या गोष्टींचे मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
"या अभ्यासक्रमाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर (एनसीईआरटी) आधारित आवश्‍यक शिक्षण, तसेच राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, मानवशास्त्र आदी विषयांबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी "ई-लर्निंग कीट'चा उपयोग केला जाणार असल्याने त्याची उजळणी करणे किंवा संकल्पना समजून घेणे सुलभ होणार आहे. वसतिगृहाची सुविधा वगळता इतर सर्व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. त्यात रीडिंग हॉल, संदर्भ पुस्तके, नियतकालिके यांचा समावेश असेल,'' असे उमराणीकर यांनी सांगितले. 

पहिल्या वर्षी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश 
अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यासाठी सात ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याबाबत http://unipune.ac.in/cec/default.htm या लिंकवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. 

नव्याने सुरू करण्यात येणारा हा अभ्यासक्रम यशस्वी झाला, तर तो विद्यापीठाच्या इतर केंद्रांवरही चालविण्यात येईल. मात्र, त्यासाठी तीन वर्षांच्या पहिल्या बॅचला मिळणारा प्रतिसाद पाहिला जाणार आहे. 
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special training at Pune University to increase Marathi percentage in UPSC