

पुणे, ता. २८ ः इंधनाचा तुटवडा, तांत्रिक बिघाड आणि प्रशासकीय गैरव्यवस्थापनामुळे पुणे विमानतळावर ‘स्पाईसजेट’चे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. विमानांना तब्बल आठ-आठ तास उशीर होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून, विमानतळावरील गर्दी वाढल्याने सुरक्षा यंत्रणेवरही प्रचंड ताण येत आहे.
पुणे विमानतळावरची ऑगस्टमधील स्थिती लक्षात घेतली, तर स्पाईसजेटची १० उड्डाणे प्रभावित झाली आहेत. यात सहा उड्डाणे देशांतर्गत होती, तर चार आंतरराष्ट्रीय उड्डाणाचा समावेश आहे. या सर्व उड्डाणाच्यावेळी प्रवासी बोर्डिंग गेटवर आल्यावर विमानांना उशीर असल्याचे कळविण्यात आले आहे. शिवाय ‘डीजीसीए’च्या नियमांनुसार प्रवाशांना उड्डाणांस उशीर झाल्यानंतर अल्पोपाहाराची सुविधा उपलब्ध करून संबंधित विमान कंपनीचे काम आहे. येथे मात्र एकाही प्रवाशांना ही सुविधा देण्यात आलेली नाही. परिणामी प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
दरम्यान, विमान विलंबाचे सर्वात गंभीर कारण २३ ऑगस्ट रोजी समोर आले. पुणे ते दुबई आंतरराष्ट्रीय मार्गावर जाणाऱ्या ‘एसजी ५१’ या विमानाला तब्बल ४ तासांचा विलंब झाला. यामागील कारण तांत्रिक नसून, ‘स्पाईसजेट’ने हिंदुस्थान पेट्रोलियमची इंधनाची थकीत बिले न भरणे हे होते. इंधनाचे पैसे न दिल्याने उड्डाण रोखले जाणे, हे कंपनीच्या ढासळत्या आर्थिक नियोजनाचे मोठे उदाहरण आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘स्पाईसजेट’ची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
असे बिघडले वेळापत्रक :
देशांतर्गत उड्डाणे
- ७ ऑगस्ट : एसजी - ९३७ : पुण्याहून दिल्लीसाठी सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण अपेक्षित. मात्र हे विमान पोहोचण्यास उशीर झाल्याने पुण्याहून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी उड्डाण झाले. साडेपाच तासांचा उशीर.
- ११ ऑगस्ट : एसजी ९३७ : पुण्याहून दिल्लीसाठी सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण अपेक्षित. प्रत्यक्षात ८ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण. तीन तास उशीर. हे विमान पुण्यात पोहोचण्यास उशीर झाल्याने यालाही उशीर.
- १२ ऑगस्ट : एसजी १०६ : पुण्याहून दिल्लीसाठी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण अपेक्षित, प्रत्यक्षात सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी उड्डाण. आठ तासांचा उशीर. तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण.
- १८ ऑगस्ट : एसजी १०६ : पुण्याहून दिल्लीसाठी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण अपेक्षित, प्रत्यक्षात मध्य रात्री ३ वाजून ३० मिनिटांनी उड्डाण. विमानाला चार तासांचा उशीर, विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे कंपनीने सांगितले.
- २३ ऑगस्ट : एसजी १०६ : पुण्याहून दिल्लीसाठी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण अपेक्षित, प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उड्डाण. सहा तासांचा उशीर, पुणे विमानतळावर तांत्रिक बिघाड. पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान रद्द.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे :
- १५ ऑगस्ट : एसजी ५१ ः पुण्याहून दुबईसाठी रात्री ९ वाजता उड्डाण अपेक्षित, प्रत्यक्षात मात्र पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी उड्डाण. ७ तास विलंब, कारण दिले पुण्यात उशिरा विमान दाखल झाले.
- १६ ऑगस्ट : एसजी ५१ ः पुण्याहून दुबईसाठी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण अपेक्षित, प्रत्यक्षात मात्र पहाटे ४ वाजता उड्डाण झाले. ७ तास विलंब. कारण दिले पुणे विमानतळावर तांत्रिक बिघाड.
- १७ ऑगस्ट : एसजी ५१ ः पुण्याहून दुबईसाठी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण अपेक्षित, प्रत्यक्षात मात्र मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण. तीन तास विलंब, कारण दिले चेक-इन सर्व्हरमधील बिघाड.
- २३ ऑगस्ट : एसजी ५१ ः पुण्याहून दुबईसाठी रात्री ९ वाजता उड्डाण अपेक्षित, प्रत्यक्षात मात्र मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण. ४ तास उशीर, कारण दिले हिंदुस्थान पेट्रोलियमची थकीत बिले न भरणे.
विमानाला विलंब झाल्यावर किंवा उड्डाण रद्द झाल्यावर प्रवाशांना योग्य माहिती देणे आणि पर्यायी व्यवस्था करणे ही संबंधित विमान कंपन्यांची जबाबदारी आहे. मात्र, येथे असे होताना दिसून येत नाही. संबंधित विमान कंपनीने आपल्या वेळापत्रकावर काम करणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या हितासाठी विमानतळ प्रशासनाने संबंधित विमान कंपनीला समज देणे आवश्यक आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ञ, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.