
पुणे - विविध उपनगरांमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हडपसर, कोथरूड, कात्रज, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, औंध, बाणेर, बालेवाडी, येरवडा, फुरसुंगी, वाघोली, विमाननगर, पुणे आणि खडकी कॅंटोन्मेंट आदी परिसरातील चौक, मुख्य रस्त्यांसह गल्ली, बोळ ओस पडले होते. सर्वत्र नीरव शांतता अनुभवास येत होती.
हडपसरला शटरडाऊन, रस्ते सामसूम
हडपसर - लॉकडाउन केल्याचे दृश्य रविवारी सर्वत्र हडपसरमध्ये पाहावयास मिळाले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा, दुकाने, कार्यालये आणि बाजारपेठा आज पूर्णपणे बंद होत्या. नागरिकांनी अत्यावश्यक खरेदी शनिवारी संध्याकाळीच उरकली होती. रविवारी सकाळी येथील मुख्य बाजारपेठांचा भाग असलेली पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई, कामधेनू इस्टेट, ससाणेनगर रस्ता, गाडीतळ हे भाग पूर्ण बंद होते. रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला थांबवून पोलिस तो कुठे व कशासाठी जात आहे याची चौकशी करत होते. पीएमपी बस तुरळक प्रमाणात सुरू होत्या. मात्र त्यात प्रवासी नसल्याचे चित्र पहायला मिळाले. हातावरचे पोट असणारा वर्ग देखील घरातच थांबून होता. गल्लीबोळातील महिलांचा रोजचा कलकलाटही ऐकायला मिळाला नाही. लहान मुले यांना घराबाहेर पडण्यास पालकांनी मज्जाव केल्याने तीसुद्धा घरात दूरचित्रवाणीसमोर बसली होती. दुकानांचे शटरडाऊन, घरांचे दरवाजे बंद तर रस्ते सामसूम असे चित्र प्रथमच पाहायला मिळाले.
सासवड रस्ता थांबला
फुरसुंगी : रात्रंदिवस जड वाहतुकीने भरून वाहणारा सासवड रस्ता पूर्ण मोकळा, गर्दीने गजबजलेले चौक निर्मनुष्य, अत्यावश्यक सेवेतीलही फक्त औषध दुकाने सुरू, अशा पूर्ण शुकशुकाटाच्या वातावरणात फुरसुंगी परिसरात जनता कर्फ्यूचे वातावरण दिसून आले. एरवी पहाटेपासून गर्दी असणाऱ्या ग्लायडिंग सेंटर परिसरात शुकशुकाट होता.
उरुळीचा घाऊक बाजार पूर्णत- बंद
उरुळी देवाची : भेकराईनगर, उरुळी देवाची, वडकी, होळकरवाडी, हांडेवाडी या ग्रामीण पट्ट्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सर्व व्यवहार बंद ठेवले. सासवड रस्त्यालगतची कपड्याची होलसेल दुकाने, गोडाउन, लहान-मोठे व्यावसायिकांनी बंदमध्ये शंभर टक्के सहभाग घेतला. बंदमध्ये सर्व वाहतूकदारांनी सहभाग घेतल्याने अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी व धुळीचे लोट यामुळे होणारे प्रदूषण थांबल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
खराडी आयटी हबने घेतली विश्रांती
वडगाव शेरी : डझनभर पंचतारांकित हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था, मोठी बाजारपेठ, मोठे मॉल, लाखो संगणक अभियंते सामावून घेणारे मोठे आयटी हब अशी ओळख असलेल्या नगर रस्ता परिसरात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. विमाननगर चौक, वडगाव शेरी फाटा, चंदननगर चौक, चंदननगर बाजार, खराडीचा परिसर, खराडी बाह्यवळण चौक आदी इतर वेळी रहदारीमुळे गजबजलेले असतात. आज मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर कोणतेही वाहन रस्त्यावर दिसून आले नाही. आयटी कंपन्यांतील तरुणांना घरपोच जेवण पोचवणारे काही खासगी कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय मात्र त्यांचा गणवेश घालून जेवणाचे डबे पोचवताना दिसून आले. परिसरातील रुग्णालय सुरू होती; परंतु त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल रुग्णांव्यतिरिक्त बाहेरील कोणतेही रुग्ण तपासण्यासाठी किंवा औषध घेण्यासाठी आलेले दिसून आले नाहीत.
किरकटवाडीत तळीरामांना ब्रेक
किरकटवाडी : जनता कर्फ्यूदरम्यान खडकवासला येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच हवेली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धडक कारवाई करत सुमारे दोनशे लिटर गावठी दारू नष्ट केली. जनता कर्फ्यूला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना खडकवासला येथे मात्र हा दुर्दैवी प्रकार समोर आला. तळीरामांची, खडकवासला येथील लमाणवाडी येथील गावठी दारूच्या अड्ड्यांवर ये-जा सुरू होती. या वेळी सापडलेल्या तळीरामांचाही पोलिसांनी समाचार घेतला.
सहकारनगरला विद्यार्थ्यांसाठी भोजन
सहकारनगर : वंदेमातरम् संघटना, सरहद काश्मिरी विद्यार्थी संघटना, श्री गुरू गौतममुनी मेडिकल अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मोफत भोजन सेवा सुरू केली असून याला प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मी रस्ता, ज्ञानेश्वर पादुका चौक, आनंदनगर, संतोष हॉल, पूना मर्चंट चेंबर, मार्केट यार्ड, शारदा सेंटर नळस्टॉप, दांडेकर पूल, रामकृष्ण मठ आदी बारा ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. मैत्रीची साखळी मजबूत ठेवायची आहे.... आणि कोरोनाची साखळी तोडायची आहे, असा संदेश देत नागरिकांनी प्रतिसाद दिला.
मांजरीत पक्ष्यांचा किलबिलाट
मांजरी : मांजरी बुद्रुक परिसरात वाहने व कारखान्यांची घरघर पूर्णपणे बंद असल्याने सर्वच ठिकाणी शांतता होती. त्यामुळे नागरिकांनी परिसरात वावरणाऱ्या पक्ष्यांचा आवाज ऐकण्याचा आनंद घेतला. नेहमी गजबजलेला छत्रपती शिवाजी चौक, शेवाळेवाडी जकात नाका चौक, पंधरा नंबर चौक, रविदर्शन चौक, महादेवनगर परिसर, सोलापूर महामार्गासह सर्व ठिकाणी कमालीची शांतता होती. या कमालीच्या शांततेमुळे यंत्राच्या घरघरीत लुप्त होत असलेले परिसरातील प्राणी व पक्ष्यांचे आवाज आज प्रकर्षाने ऐकायला मिळाले. कोकीळ, कावळा, चिमणी, पारवा, गाई गुरांचे हंबरणे स्पष्टपणे ऐकण्याचा अनुभव बालकांसह नागरिकांनी घेतला.
धायरीत विद्यार्थी, कामगारांचे हाल
धायरी : दुकानदार, व्यापारी, हॉटेल, मेस यांनी कटाक्षाने जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला; परंतु या परिसरात अनेक मोठमोठी महाविद्यालये असल्याने अनेक वसतिगृहांत विद्यार्थी राहात आहेत. संपूर्ण परिसरात बंद असल्याने विद्यार्थ्यांचे जेवणाचे प्रचंड हाल झाले. मात्र जगण्यामरण्याचा प्रश्न असल्याने आमची तक्रार नाही, अशी त्यांची भावना होती. रोजंदारीवरील कामगारांनीही अशाच भावना व्यक्त केल्या.
बाणेरला रस्त्यावर उतरले पक्षी
बालेवाडी : सोसायट्यांमध्ये नागरिकांनी तीन-चार दिवसांपासून घराबाहेर पडणे टाळले, तर काही सोसायट्यांमध्ये जनता कर्फ्यूमुळे मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले. त्यामुळे दूधवाला, पेपरवाला यांना गेटवरूनच मागे परतावे लागले. नागरिकांना औषधासाठी बाहेर पडता आले नाही. केवळ पक्ष्यांचा किलबिल ऐकू येत होता. सकाळी दहाच्या सुमारास बाणेर म्हाळुंगे रस्त्यावर कबुतरांचे थवे पाहायला मिळाले.
धनकवडीत बसमध्ये तुरळक प्रवासी
धनकवडी - जनता कर्फ्यूला धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसर आणि कात्रज परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार ठप्प होते. पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. पीएमपी बस तुरळक प्रमाणात सुरू होत्या.
हाच का तो सिंहगड रस्ता?
सिंहगड रस्ता : एरवी गर्दीने ओसंडून वाहणारा, वाहतूक कोंडीत हरवलेल्या सिंहगड रस्त्यावर रविवारी मात्र नीरव शांतता होती. त्यामुळे हाच का तो सिंहगड रस्ता, असा प्रश्न पडला होता. दांडेकर पूल चौकापासून ते थेट वडगाव पुलापर्यंत सर्वत्र शांतता होती. दर मिनिटाला किमान शंभर तरी वाहने जाणाऱ्या चौकात क्वचितच एखादे वाहन दिसत होते. सगळीकडे शांतता पाळली जात होती. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. माणिकबाग येथील कालिदास मते म्हणाले, कधी नव्हे तर माणिकबाग डीपी रस्ता आणि सिंहगड रस्ता इतका शांत अनुभवला. अतिक्रमणांनी, वाहनांनी गजबजलेला रस्ता आज शांत होता.
खडकीकरांचा शंभर टक्के प्रतिसाद
खडकी बाजार : खडकी, वाकडेवाडी, बोपोडी, औंधरोड, पाटील इस्टेट परिसरातील नागरिकांनी बंदला प्रतिसाद देत दैनंदिन व्यवहार बंद करून रविवारी घरी बसणे पसंत केले. संपूर्ण बाजार परिसरात एकही दुकान उघडे दिसत नव्हते. एरवी पाय ठेवायला खडकी बाजारात जागा नसते, मात्र रविवारी स्मशान शांतता पसरली होती.
रेल्वे प्रवाशांची तपासणी
कॅंटोन्मेंट : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात इतिहासात पहिल्यांदाच शांतता आढळली. सर्व फलाटांवर शुकशुकाट होता. शनिवार रात्री १२ नंतर एकही रेल्वेगाडी सोडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु, लांब पल्ल्याच्या गाड्या दुपारी दीडनंतर असल्याने प्रवाशांना स्टेशनबाहेर उन्हातान्हात मुलाबाळांसहित बसावे लागले. गाडी येणाच्या पंधरा मिनिटे अगोदर स्थानकांवर परवानगी दिली. आरपीएफ व जीआरपी जवानांकडून प्राथमिक तपासणी सुरू होती. वाद घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला. नियमभंग केल्यामुळे हद्दीबाहेर पिटाळले.
वारजे पुलाखाली शांतता
वारजे : वारजे उड्डाण पूल चौकासह सर्वच रस्त्यांवर शांतता होती. सिमेंटच्या जंगलातून पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले. नागरिकांनी जनता कर्फ्यूला १०० टक्के साथ दिल्याचे दिसून आले. पहाटे नागरिक मॉर्निंग वॉकला बाहेर पडले नाहीत. पुलाखाली एकही मजूर; तसेच वाहन दिसले नाही. सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. कर्वेनगर चौकात दिवसभरात एकही वाहन व माणूस फिरकताना दिसला नाही. पोलिस दिवसभर गस्त घाल होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.