विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : ऑनलाइन परीक्षेचा पर्याय विचारात; मात्र अद्याप निर्णय नाही!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

परीक्षा कधी घ्यायच्या, कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबत सर्वच विद्यापीठांपुढे प्रश्नचिन्ह आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे याबाबत घेतलेल्या बैठकीचा अहवाल तयार केला जात आहे. हा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल.

पुणे : "कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने आता लॉकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या प्रलंबित परीक्षांचे नियोजन करताना कमी वेळात अधिक प्रभावीपणे परीक्षा कशा घेता येतील, असा विचार करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा घेण्याचा पर्याय सोईस्कर असला तरी सरसकट सर्वत्र हा पर्याय वापरणे शक्य होणार नाही. त्यामुळे या परिस्थितीत परीक्षा पद्धतीसाठी विविध पर्याय विचारात घेतले जात आहेत," अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन करण्यासाठी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे संचालक, अभ्यास मंडळाचे सदस्य यांची बैठक घेतली. या बैठकीत सध्याची परिस्थिती लक्षात घेता परीक्षा घेण्यासाठीच्या विविध पर्यायांवर विचार झाला. या संदर्भातील अंतिम अहवाल राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडे येत्या दोन दिवसांत सादर केला जाणार आहे.

- Lockdown : दिल्लीत यशस्वी ठरलं 'ऑपरेशन शिल्ड'; कोरोनाला रोखण्यात यश!

यापूर्वी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाला होता, हा लॉकडाऊन रद्द झाला असता तर, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले असते. मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यानुसार ३० एप्रिलनंतर लॉकडाऊन रद्द झाल्यास त्यानंतर काही दिवसांनी परीक्षा घेण्यात येतील," असे डॉ. करमळकर यांनी नमूद केले.

परीक्षा घेण्यासाठी या पर्यायांचा होतोय विचार :
- ऑनलाइन परीक्षा
- एक-एका तासाची ऑफलाइन परीक्षा
- स्काईपद्वारे 
- प्रकल्प सादरीकरण

- लॉकडाऊन वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

"परीक्षा कधी घ्यायच्या, कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबत सर्वच विद्यापीठांपुढे प्रश्नचिन्ह आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे याबाबत घेतलेल्या बैठकीचा अहवाल तयार केला जात आहे. हा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल. जेणेकरून इतर विद्यापीठांनाही हे नियोजन मार्गदर्शक ठरेल; परंतु सध्या लॉकडाऊन वाढल्याने प्रत्यक्षात परीक्षेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- Coronavirus : नोकरी जाण्याच्या दडपणाखाली जगताहेत ६६ लाख अमेरिकी नागरिक!

विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, यावर विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातून विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना मिळतील."
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SPPU will conduct Online University exams said vice chancellor Nitin Karmalkar