Pune : अध्यात्म नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे काम करते : श्री श्री रविशंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री श्री रविशंकर

Pune : अध्यात्म नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे काम करते : श्री श्री रविशंकर

पुणे- ‘‘मानसिक बळ कमी होऊन माणसांतील अंतर दूर होण्याच्या काळातून आपण जात आहेत. या काळात स्थानिक भाषेच्या माध्यमांनी नागरिकांत उत्साह निर्माण केला पाहिजे. कामाच्या तणावातून दूर होण्यासाठी अध्यात्म हवे. कारण नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे काम अध्यात्म करते,’’ असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’तर्फे दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत, ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘न्यू १८ लोकमत’चे संपादक आशुतोष पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सेनापती बापट रस्त्यावर मेरियट हॉटेलमध्ये शनिवारी (ता. ४) हा सोहळा पार पडला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, ‘भारती इन्स्टिट्यूट’चे संस्थापक रवींद्र भरती, ‘एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे संस्थापक डी. के. भोसले, पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यावेळी उपस्थित होते.

श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘ माध्यमांचे काम केवळ व्यक्तींच्या चुका दाखवणे नाही तर चांगल्या कामाचा सन्मान करणे देखील आहे. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या चारही स्तंभांना अध्यात्माने जोडून ठेवले आहे. कारण जेथे अध्यात्म असेल तेथे चांगले राजकारण होते’’. पाटील म्हणाले, ‘‘सन्मान करण्यात आलेल्या पत्रकारांनी सातत्याने समाजाच्या हितासाठी ठामपणे भूमिका मांडल्या आहेत. सकारात्मक प्रयत्न करण्याबाबत ते आग्रही आहेत.’’ भोकरे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तर पंकज बिबवे यांनी आभार मानले.

यांचा करण्यात आला सन्मान-

सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी, अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, अनिल कुमार, शेखर मुंदडा, प्रकाश शहा, अनुप मेहता, बाबासाहेब औटी, मिलिंद कुलकर्णी, बबन दहिफळे, नीलेश खेडेकर, किरण दाभाडे आणि चैतन्य व नीलम धोका, जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज संस्थान देहू आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट.