एसटीचे अधिकारी एजंटांविरोधात रस्त्यावर; प्रवासी पळविणाऱ्या सात जणांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढते. या काळात एसटी स्थानकांजवळ खासगी प्रवासी बसचे एजंट एसटीचे प्रवासी पळवितात, असा महामंडळाचा अनुभव आहे. ST officer on the streets against agents

पुणे - एसटी बसचे प्रवासी पळविणाऱ्या खासगी बसच्या एजंटांना रोखण्यासाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पोलिसांच्या मदतीने एजंटांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. 

दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढते. या काळात एसटी स्थानकांजवळ खासगी प्रवासी बसचे एजंट एसटीचे प्रवासी पळवितात, असा महामंडळाचा अनुभव आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार एसटी स्थानकापासून 200 मीटरवर कोणत्याही खासगी प्रवासी बसला थांबण्यास परवानगी नाही. परंतु, या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्यामुळे या बाबत कारवाई करण्याची विनंती एसटी महामंडळाने शहर पोलिसांना केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता एसटीने पुण्यात 6 पथके तयार केली असून, त्यात 30 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


दिवाळीच्या काळात 12 ते 22 नोव्हेंबर दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर (वाकडेवाडी), स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड स्थानकावरून सुमारे 530 जादा बस सोडण्यात येणार आहेत. गर्दीच्या काळात एजंटांचा होणारा उपद्रव टाळण्यासाठी प्रत्येक स्थानकावर दोन पथके अहोरात्र काम करण्यास बुधवारपासून सुरवात झाली आहे. या पथकांनी दिवसभरात सात खासगी एजंटांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम शिवाजीनगर, स्वारगेट पोलिस ठाण्यात सुरू होते. 

येथून सुटणार जादा बस 
- शिवाजीनगर (वाकडेवाडी) ः नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, सिल्लोड, चोपडा, धुळे, हिंगोली, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, मेहकर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगाव, तुळजापूर, उमरगा, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा 
- पिंपरी चिंचवड स्थानक ः नियमित बस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, गणपतीपुळे, महाड, दापोली, लातूर 
- स्वारगेट ः नियमित बसशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, जिल्हा व बारामती, भोर 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एसटी स्थानकांजवळून होणारी बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाची सहा पथकेही तैनात करण्यात आली आहेत. सुट्यांनिमित्त जादा बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- ज्ञानेश्‍वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST officer on the streets against agents