

पुणे, ता. १६ : ‘‘ग्रह आणि तारे म्हणजे काय, त्यातील प्रत्येकाचे काही वेगळेपण असते का, यांसारखे प्रश्न मुलांना पडतात. ही अद्भुत माहिती ‘अब्जावधी तारे, लाखो प्रश्न : आपल्या वैश्विक भवतालाची सफर’ या पुस्तकातून मुलांनी व पालकांनी करून घ्यायला हवी,’’ असे मत नाट्यकर्मी श्रीधर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
आकाशनिरीक्षक व खगोलविज्ञान माहिती प्रसारक सोनल थोरवे यांच्या ‘अब्जावधी तारे, लाखो प्रश्न : आपल्या वैश्विक भवतालाची सफर’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. बालदिनाचे औचित्य साधून शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंचावर हा कार्यक्रम झाला. अमलताश बुक्स, द नोमाड स्टारबॉर्न आणि बहुरंगी व्हिज्युअल आर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात थोरवे यांच्या ‘अ मिलियन क्वेश्चन्स, अ बिलियन स्टार्स’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी अनुवादक आणि प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी म्हणाले, ‘‘बहुसंख्य लोकांना आकाश आणि अवकाश यांतील नेमका फरक माहीत नसतो. हा फरक सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगण्याची गरज आहे.’’
पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना सोनल थोरवे म्हणाल्या, ‘‘शालेय अभ्यासक्रमातून मुलांना सौरमालेची ओळख होते. मात्र, त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सूर्याचा नेमका रंग कोणता, तारे कसे तयार होतात आणि ते वेगवेगळ्या रंगांचे का दिसतात, असे प्रश्न त्यांना पडतात. या प्रश्नांची उत्तरे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ‘अ मिलियन क्वेश्चन्स, अ बिलियन स्टार्स’ हे पुस्तक इंग्रजीत लिहिले. खगोलविज्ञानासंबंधी विविध संस्थांमधील मुलांशी संवाद साधताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांतून या पुस्तकाची कल्पना सुचली. त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावीत, हा पुस्तक लेखनामागील उद्देश आहे.’’
याप्रसंगी थोरवे यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला. संजना यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दोन बालनाट्ये सादर करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.