राज्यात पावणेतीन कोटींचा मद्यसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

डी के वळसे पाटील
रविवार, 5 एप्रिल 2020

- राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ४७२ आरोपींना अटक

मंचर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत. उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून एक हजार २२१ गुन्हे नोंदविण्यात आले. ४७२ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण दोन कोटी ८२ लाख ३१ हजार १०२ रुपये किमतीचा मुद्देमाल व ३६ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

ते म्हणाले ," महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्यतस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उपायुक्त व संबंधित अधीक्षकांना नाकाबंदी करण्याचे, अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध नियंत्रणात्मक कारवाई करण्याचे तसेच गुन्हे नोंदविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही. याकरिता बारा कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत.

18 तात्पुरते सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असून, पूर्ण नाका-बंदी करण्यात आलेली आहे. विभागातील अधिकारी- कर्मचारी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई केली जात आहे. 

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.

टोल फ्री क्रमांक  १८००८३३३३३३  व्हॉट्सऍप क्रमांक ८४२२००११३३. ई-मेल : commstateexcise@gmail.com आहे. सदर क्रमांकावर अवैध मद्यविक्रीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी." असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी  केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Excise Officers Seized Liquor of rs 2 Crore 82 Lakhs