esakal | Maharashtra Budget 2021 : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावाला राज्यसरकारची मंजूरी

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2021 : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावाला राज्यसरकारची मंजूरी}

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आभार.

pune
Maharashtra Budget 2021 : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावाला राज्यसरकारची मंजूरी
sakal_logo
By
डी. के. वळसे-पाटील

मंचर : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आभार मानले असून गेल्या अनेक वर्षांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेने पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

Breaking : पुण्यात आगीच्या दोन घटना; पुणे-सोलापूर हायवेवर ट्रॅफिक जाम​ 

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजूरी मिळावी यासाठी गेले वर्षभर मी युद्धपातळीवर प्रयत्न करीत होतो. मुख्यमंत्र्यांसमोर प्रकल्पाच्या सादरीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर मंजुरी मिळण्याची औपचारिकता बाकी होती. या प्रकल्पासाठी स्वतः उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार आग्रही होते. त्यांनीही प्रत्येक टप्प्यावर या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेला मंजुरी दिल्याची घोषणा करून शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे स्वप्न पूर्ण केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने कर्ज उभारणी व भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर कोविडच्या संकटामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे स्वप्न लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे गेले काही महिने खासदार डॉ. कोल्हे सातत्याने हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी यावा यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. मात्र कोविडच्या संकटामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळण्यास विलंब होत होता. मात्र कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री पवारही उपस्थित होते. सादरीकरण पाहिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अखेर अर्थसंकल्प सादर करताना पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. 

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा केल्यामुळे जनतेचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे असे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले की, आता हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी आपण प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करणार आहोत. गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे (महारेल) व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश जैस्वाल यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. त्यावेळी अर्थ, नियोजन, महसूल, परिवहन विभागांचे अपर मुख्य सचिव व स्वत: डॉ. कोल्हे उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी हा प्रकल्प आपल्याला करायचा आहे असे स्पष्ट करुन कॅबिनेटच्या मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

मार्केटयार्डातील वाय उड्डाणपुलाची निवीदा होणार रद्द

डॉ. कोल्हे यांनी चिकाटीने केलेल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रकल्पाची सूत्रं आपल्या हाती घेत हा रेल्वेमार्ग जात असलेल्या पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सर्व आमदारांसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करून सर्वांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावर चाकण येथे इंडस्ट्रीयल रॅक तर नारायणगाव येथे कृषी उत्पादनांसाठी रॅकची माझी मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना तसेच खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतमाल देशभरात पोहोचविण्यासाठी उपयोग होणार असून त्यामुळे रोजगार निर्मिती होईल. तसेच शेतकऱ्यांंचा मोठा फायदा होईल. त्याचबरोबर उत्तर पुणे जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठीही याचा फायदा होईल. हा प्रकल्प शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कॉम्प्रिहेंन्सिव्ह मोबिलिटी प्लानच्या दृष्टीनेही दूरगामी परिणाम करणारा ठरेल, अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.

(संपादन : सागर डी. शेलार)